मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या भागांमध्ये नागरिक मुलभूत सुविधांपासून वंचित असल्याची अनेक उदाहरणे आपण पाहिली असतील. या सगळ्यामुळे माणसांना जिवंतपणी नरकयातना भोगाव्या लागतात. मात्र, मरणानंतरही माणसाला अशाच यातनांचा सामना करावा लागत असल्याचा प्रकार वर्सोव्यात समोर आला आहे.
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या वर्सोवा गावाच्या स्मशानभूमीत कोणत्याही सुविधा नाहीत. त्यामुळे भर पावसात ताडपत्रीचे छत बांधून मृतदेहाला अग्नी देण्याची वेळ येथील नागरिकांवर ओढावली आहे. अनेकदा स्मशानभूमी व छताची मागणी करूनही मीरा-भाईंदर महापालिकेने येथे कोणत्याही उपाययोजना न केल्याने गावकरी हताश झाले आहेत.
यापूर्वी वसईतही असाच प्रकार समोर आला होता. येथील माजीवली गावात स्मशानभूमी नसल्याने नागरिकांना नाल्याच्या काठावर मृतदेहासाठी चिता पेटवावी लागली होती. ही गोष्ट एवढ्यावर थांबली नाही. काही दिवसांनी या जागेकडे जाणारा रस्ता मालकाने बंद केल्यामुळे माजिवलीतील ग्रामस्थांचा हा पर्यायही बंद झाला होता. हा प्रकार समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. मात्र, या सर्व प्रकारानंतरही प्रशासनाला जाग आली नसल्याचे दिसत आहे.