महाराष्ट्रातील पूरस्थितीबाबत पंतप्रधानांनी साधला मुख्यमंत्र्यांशी संवाद

केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल 

Updated: Oct 16, 2020, 10:12 PM IST
महाराष्ट्रातील पूरस्थितीबाबत पंतप्रधानांनी साधला मुख्यमंत्र्यांशी संवाद  title=

मुंबई : परतीच्या पावसाने महाराष्ट्रातील काही भागांना झोडून काढलं आहे. या पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांच मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे. या संदर्भात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला आहे. मोदींनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. 

महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि पूरस्थितीबाबत मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांच्याशी बोललो. आपत्तीग्रस्त बंधू-भगिनींबरोबर माझ्या सहवेदना आहेत. बचाव आणि मदतकार्यामध्ये केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल असं आश्वासन मी पुन्हा एकदा दिलं, असं मोदींनी ट्विट करून म्हटलं आहे. 

राज्यात  काही दिवसांसाठी पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही गाफील राहू नका. नागरिकांनाही गाफील राहू देऊ नका.  लोकांना माहिती देत राहा. प्राणाहानी होऊ नये यासाठी नागरिकांना  विश्वासात घेऊन स्थलांतराचे काम करा असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी   राज्यातील प्रशासकीय यंत्रणेला अतिवृष्टी व पुरस्थितीत सतर्क राहून काम करण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांनी आज  पुणे, कोकण, औरंगाबाद आणि नाशिक विभागीय आयुक्त तसेच या विभागातील जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधून पुरस्थितीचा आढावा घेतला. 

अतिवृष्टीमुळे मराठवड्यातील शेतीचे सगळ्यात जास्त नुकसान झालं आहे. मराठवाड्यातील 4 लाख 99 हजार 648 हॅकटर शेतीचे नुकसान झालं आहे. यात उस्मानाबाद जिल्ह्यात 1 लाख 36 हजार 176 हॅकटर नुकसान झालं आहे. नांदेड 1 लाख 10 हजार 685 हॅकटर नुकसान झालं आहे. सोयाबीन,बाजरी,मका,कपाशी, तूर,उडीद, केळी यांच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.मराठवड्यात एकूण 16 जणांचा मृत्यू झाला असून 147 जनावर दगावली आहेत. तर 124 घरांचे नुकसान झाले आहे.