घोळक्यातून हातातली बॅग गायब... 'जादूगार गँग'ची करामत

ज्याला लुबाडायच आहे त्या सावजाला 'धुरा' म्हणतात 

Updated: Jul 21, 2018, 04:36 PM IST

सचिन गाड, झी मीडिया, मुंबई : बातमी मुंबईतल्या जादूगार गँगची.... ही गँग इतक्या सराईतपणे चोऱ्या करायची की त्यांची ही चोरी करण्याची पद्धत पाहून तुम्ही थक्क व्हाल... पण आता अखेर या टोळीतल्या दोघांना पोलिसांनी बेड्या घातल्यात. सीसीटीव्हीची ही दृश्यं नीट पाहिली तर घोळक्यातून जाताना एक माणूस दिसेल...  त्याच्या हातात एक पिशवीही दिसतेय... अचानक काहीतरी होतं आणि त्या माणसाच्या हातातली पिशवी गायब होते. भररस्त्यात कुणीतरी ही पिशवी चोरली? हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो... 

हे सगळे सराईत ठक आहेत... ज्याच्याकडची वस्तू चोरायची, त्याच्या मागे दोघं जण बॅगा घेऊन येतात... बॅगांनी त्याचे डोळे झाकतात आणि तिसरा माणूस पिशवी चोरतो आणि ती पिशवी चौथा घेऊन जातो... पाहता पाहता सगळे जण पसार होतात, अशीच त्यांची मोडस ऑपरेन्डी असल्याचं जीआरपी पोलीस निरीक्षक संतोष धनवटे यांनी म्हटलंय. 

अगदी अशाच पद्धतीनं मस्जिद बंदर स्थानकात एका प्रवाशाला लुटण्यात आलं. चेतन दोशी या प्रवाशाचा या टोळीनं गोरेगाव ते मस्जिद बंदरपर्यंत पाठलाग केला आणि संधी मिळताच त्याची साडे चार लाख रूपये रोकड असलेली पिशवी घेऊन पळ काढला. अशा पद्धतीनं या टोळीनं वीस जणांना लुबाडलंय. त्यासाठी त्यांची सांकेतिक भाषाही आहे.  

ज्याला लुबाडायच आहे त्या सावजाला 'धुरा' म्हणतात 

रोख रक्कम म्हणजे 'नंगा पत्ता'

चोरी करायला तय्यार रहा म्हणजे 'डाव लेने का है तय्यार रहो'

एप्रिलमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी परराज्यांत पळून गेले होते. त्यानंतर राजस्थानच्या अजमेर आणि दिल्लीच्या पहाडगंज परीसरात तब्बल ४०० लॉज चेक केल्यानंतर बबलू ईस्माईल शेख आणि ठाण्यातून बंटीला अटक करण्यात आलीय... आता त्यांचे इतर दोन साथीदार पोलीस शोधतात.