शिवसेना भवन परिसरात बाळासाहेब ठाकरे, इंदिरा गांधींचे पोस्टर

सत्यमेव जयते..... 

Updated: Nov 28, 2019, 08:29 AM IST
शिवसेना भवन परिसरात बाळासाहेब ठाकरे, इंदिरा गांधींचे पोस्टर  title=
छाया सौजन्य- एएनआय

मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाराष्ट्रविकास आघाडीच्या हाती राज्याची सत्ता जात आहे. याच आघाडीचे नेते म्हणून तिन्ही मित्रपक्षांनी उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. ज्या पार्श्वभूमीवर गुरुवारी मुंबईतील शिवाजी पार्क येथे ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. याच धर्तीवर मुंबई आणि परिसरात शिवसेनेचं शक्तीप्रदर्शन पाहायला मिळत आहे. 

शिवसेना भवन येते करण्यात आलेली रोषणाईच याची प्रचिची देऊन गेली. तर, या परिसरात लावण्यात आलेले फलकही बरंच काही सांगून जात आहेत. शिवसेनेच्या नेता आणि कार्यकर्त्यांतर्फे येथे लावण्यात आलेल्या पोस्टरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचीही काही दुर्मिळ छायाचित्र पाहायला मिळत आहेत. 

इतकंच नव्हे, तर बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचीही काही छायाचित्र या पोस्टरवर लावण्यात आली आहेत. 'मुख्यमंत्री शिवसेनेचा', 'माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार' आणि 'सत्यमेव जयते' असंही या पोस्टवर लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे हे पोस्टरही तितकेच लक्षवेधी ठरत आहेत. 

इंदिरा गांधी, शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे अशा देशाच्या राजकारणातील अत्यंत मह्त्वाच्या व्यक्तींमध्ये असणारे राजकीय नातेसंबंध, पवार आणि ठाकरे कुटुंबातील राजकीय संबंधांपलीकडलं नातं या साऱ्याचीच चर्चा यानिमित्ताने होत आहे. 

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवत ठाकरे कुटुंबातील ते अशी व्यक्ती ठरले, ज्यांनी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरत यश संपादन केलं. तर आता उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहेत. एकंदरच बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं आणि महाविकास आघाडीच्या सत्तेमुळे राजकारणाचं एक वेगळं पर्व पाहण्याची संधी जनतेला मिळणार आहे.