रेल्वे इंजिन ते धनुष्यबाण : शिवसेनेने आतापर्यंत या चिन्हांवर लढवल्या आहेत निवडणुका

निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नवं चिन्ह मिळालं आहे.

Updated: Oct 10, 2022, 09:37 PM IST
रेल्वे इंजिन ते धनुष्यबाण : शिवसेनेने आतापर्यंत या चिन्हांवर लढवल्या आहेत निवडणुका title=

मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांना झटका बसला. त्यानंतर दोन्ही गटाकडून चिन्हांसाठी नवीन पर्याय देण्यात आले. ज्यापैकी ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळाले आहे. उद्धव ठाकरे गटाकडून  मशाल, उगवता सूर्य आणि त्रिशूळ या 3 चिन्हांची मागणी केली गेली होती. तसेच ठाकरे गटाच्या पक्षाचे नाव शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) असे असणार आहे.

बाळासाहेब ठाकरे यांनी 1968 साली पक्षाची राजकीय संघटना म्हणून नोंद केली होती. डरकाळी फोडणारा वाघ ही सेनेची आधी ओळख होती. पण निवडणूक आयोगाच्या यादीत हे चिन्ह नव्हतं. त्यामुळे त्यांना ते मिळालं नाही. शिवसेनेने पहिल्यांदा ठाणे पालिकेची निवडणूक लढवली होती. तेव्हा शिवसेनेने ढाल तलवार हे चिन्ह घेतलं होतं.

1968 ला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारात मिरवणुकीत धनुष्यबाण घेतलेले राम लक्ष्मण प्रसिद्ध झाले होते. या निवडणुकीत देखील शिवसेनेनी ढाल तलवार या चिन्हावर निवडणूक लढवली होती. पण मिरवणुकीत राम-लक्ष्मण बनलेल्यांच्या हातात धनुष्यबाण होता. ती अधिक चर्चेत राहिली.

परळचे कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कॉ. कृष्णा देसाई यांच्या हत्येनंतर पोटनिवडणूक शिवसेनेने पहिला विजय मिळवला. शिवसेनेचा पहिला आमदार विधानसभेत गेला. बाळासाहेबांनी परळचे नगरसेवक वामनराव महाडिक यांना उमेदवारी दिली होती. शिवसेनेचे उमेदवार असलेल्या वामनराव महाडिक यांचं चिन्ह होतं उगवता सूर्य. त्यांच्या विजयामुळेच शिवसेना नावाच्या पक्षाचा राजकीय उदय झाला असं देखील बोललं गेलं.

शिवसेनेच्या उमेदवार वेगवेगळ्या निवडणूक चिन्हांवर काही दिवस लढावं लागत होतं. 'उगवता सूर्य' कधी 'धनुष्यबाण' तर कधी 'ढाल तलवार' यांचा समावेश होता.

1978 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनाला निवडणूक आयोगाकडून रेल्वे इंजिन हे चिन्ह देण्यात आलं होतं. प्रचाराची सुरुवात रेल्वे इंजिनची पूजा करत करण्यात आली. मुंबईतील कोकणी माणसाचं वर्चस्व पाहता प्रचारात कोकण रेल्वेला शिवसेनेचं इंजिन अशी साद घालण्यात आली होती. पण तेव्हा जनता पक्षाच्या लाटेत शिवसेनेचं रेल्वे इंजिन धावू शकलं नाही.

1984 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपच्या कमळ चिन्हावर आपले उमेदवार उभे केले होते. वामनराव महाडिक, मनोहर जोशी यांनी कमळच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती.

1988 साली झालेल्या औरंगाबाद महापालिका निवडणुकांमध्ये मात्र पक्षाने अभूतपूर्व यश मिळवलं. या निवडणुकीत त्यांचं चिन्ह होतं धनुष्यबाण. परभणी मधून उभे असलेले उमेदवार प्राध्यापक अशोक देशमुख यांनी धनुष्यबाण या चिन्हाची निवड केली होती. ते तब्बल 66 हजार मत घेऊन निवडून आले होते. या यशानंतर शिवसेनेने आपलं चिन्ह धनुष्यबाण ठरवलं. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह दिलं. त्यानंतर जवळपास तीस वर्षे याच चिन्हावर शिवसेनेने अनेक निवडणुका लढवल्या.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता शिवसेनेची ओळख बनलेलं धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून गोठवण्यात आलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाला अंधेरी पोटनिवडणुकीसाठी मशाल या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे.