'मातोश्री'वर शिजतंय सॉलिड प्लॅनिंग, ठाकरे आता थेट दिल्लीच्या तख्ताला भिडणार?

 देशपातळीवर भाजपला (BJP) कडवं आव्हान देण्याचं प्लॅनिंग 

Updated: Oct 10, 2022, 09:15 PM IST
'मातोश्री'वर शिजतंय सॉलिड प्लॅनिंग, ठाकरे आता थेट दिल्लीच्या तख्ताला भिडणार? title=

Maharashtra Politics : एका आघाडीवर शिंदेविरोधातली कायदेशीर लढाई ठाकरे लढतायत. त्याचवेळी दुसऱ्या आघाडीवर मोदींविरोधात भिडण्याची तयारी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सुरू केल्याचं समजतंय. देशपातळीवर भाजपला (BJP) कडवं आव्हान देण्याचं प्लॅनिंग मातोश्रीवर (Matoshree) सुरु आहे. भाजपच्या राजकारणाचा बळी ठरल्याचं व्हिक्टिम कार्ड उद्धव ठाकरे खेळण्याच्या तयारीत आहेत. आणि त्यातूनच ठाकरेंना देशपातळीवर पुढे आणण्याच्या हालचाली सुरु झाल्यात. 

'मातोश्री'चा प्लॅन काय?
ठाकरेंना देशपातळीवर शरद पवार, ममता बॅनर्जी, नितीशकुमार आणि अखिलेश यादव यांच्या रांगेत नेऊन बसवायचं. भाजपच्या राजकारणामुळे बाळासाहेबांची शिवसेना संपली हे कारण देशपातळीवर न्यायचं. ठाकरे थेट मोदी-शहांवर टीका करतात हे जास्तीतजास्त बिंबवायचं आणि ठाकरेंच्या आक्रमक भाषणांचा देशपातळीवर फायदा करुन घ्यायचा अशी रणनिती आहे. 

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी थेट मोदी-शहांविरोधात हल्लाबोल केला होता. भाजप-शिवसेना युती, मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावर त्यांनी शिवाजी महाराज, बाळासाहेबांची शपथ घेतली होती. उद्धव ठाकरेंच्या याच आक्रमकतेचा फायदा देशपातळीवर करायचा प्लॅन शिजतोय. 

शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्यात आल्यामुळे ठाकरेंच्या बाजूनं सहानुभूती तयार होतेय. याच सहानुभूतीच्या लाटेवर स्वार व्हायचं आणि राष्ट्रीय पातळीवर मोदीविरोधकांची आघाडी बांधायची अशी रणनीती आहे.  पण अनेक वर्षांपासून मुख्यमंत्रिपदावर असलेले  नितीशकुमार, ममता बॅनर्जींसारखे  दिग्गज केवळ सहानुभूतीच्या जोरावर ठकरेंचं नेतृत्व स्वीकारणार का? राज्याच्या राजकारणात एकदाही स्वबळावर सत्ता मिळवू न शकणा-या ठाकरेंना राष्ट्रीय नेतृत्व करता येणार का? असे प्रश्नही यानिमित्तानं उपस्थित झाले आहेत.