पास हरवल्यास डुप्लिकेट पाससाठी रेल्वेने नियमात बदल करण्याची गरज

रेल्वेचा पास हरवला तर नवा पास काढावा लागतो.

Updated: Jul 9, 2019, 08:26 PM IST
पास हरवल्यास डुप्लिकेट पाससाठी रेल्वेने नियमात बदल करण्याची गरज title=

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : मुंबईतील अनेक लोकल प्रवाशांचे पास आतापर्यंत हरवले आहेत. तुमचा रेल्वेचा पास हरवला तर नवा पास काढावा लागतो. अशीच गोष्ट भूषण कुलकर्णी या मुंबईकरांसोबत झाली. एप्रिल महिन्यात दादर स्थानकात त्यांच पाकिट चोरीला गेला. या पाकिटामध्ये त्यांचा ३ महिन्यांचा पास देखील होता. दोन दिवसांनी त्यांना पाकिटातली इतर कागदपत्रं मिळाली, मात्र पास मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी डुप्लिकेट पाससाठी तिकीट खिडकी गाठली. पण त्यांना शेवटी तेच उत्तर मिळालं जे तुम्हाला ही वाटत आहे.

भूषण कुलकर्णी यांनी म्हटलं की, मी त्यांना विनंती केली की फी आकारुन मला माझा पास द्या. मात्र त्यांनी तुमचा पास वाया गेला आहे. आता नवे पैसे भरुन नवा पास काढा. रेल्वेमध्ये अशी सोय नसल्याचं त्यांनी मला उत्तर दिलं.'

पण भूषण यांनी रेल्वेमंत्र्यांना ट्विटरद्वारे ही माहिती दिली. तसंच माहितीच्या अधिकारातून पासची माहिती मागितली. डेबिट कार्डनं पैसे भरल्याचा पुरावा जोडला. मात्र त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. 

त्यांनी म्हटलं की, माहिती अधिकारात मला या विभागाकडून त्या विभागाकडे नाचवलं. मात्र पास काही मिळाला नाही. उलट डुप्लीकेट पासची तरतूद नसल्याचं समोर आलं. माझे तीन महिन्यांचे पैसे वाया गेले. डुप्लिकेट पास देण्याची कोणतीही तरतूद नसल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं. 

पूर्वीच्या काळी पिवळ्या-हिरव्या छापील पासवर तारखेचा शिक्का मारून पास दिला जायचा. त्यावेळी आयकार्डच्या क्रमांकाचा पुरावा रेल्वेकडे नसायचा. मात्र आता पासही संगणकावर निघतो. रेल्वेकडे आयकार्डची नोंद असते. अशा वेळी रेल्वेनं आपल्या नियमांमध्ये काळानुरूप बदल करायला काय हरकत आहे? दुसरीकडे रेल्वेनं यूटीएस अॅपच्या माध्यमातून पास काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मोबाईल हरवला तर यूटीएस संपर्क साधून पास रिकव्हर होऊ शकतो. त्यामुळे प्रवाशांनी हा पर्याय स्वीकारायला हरकत नाही.