सीएसएमटी स्थानकावर स्टेशन मास्टर कार्यालयाबाहेर प्रवाशी संतप्त

स्टेशन मास्टर कार्यालयाबाहेर प्रवाशांचा गोंधळ

Updated: Sep 4, 2019, 09:01 PM IST
सीएसएमटी स्थानकावर स्टेशन मास्टर कार्यालयाबाहेर प्रवाशी संतप्त title=

मुंबई | मध्य रेल्वेची वाहतूक अजूनही ठप्पच आगे, सीएसएमटीवरुन एकही लोकल रवाना झालेली नाही, पश्चिम रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. प्रवाशी संतप्त आहे. रेल्वेकडून कोणतीही माहिती प्रवाशांना देण्यात येत नाही आहे. सकाळपासून बाहेर पडलेले चाकरमानी रेल्वे स्थानकावर अडकून पडले आहेत. सीएसएमटी रेल्वे स्थानकावरील स्टेशन मास्टर कार्यालयाबाहेर प्रवाशांनी गोंधळ घातला. लोकल सेवा कधी सुरु होईल याची माहिती दिली जात नसल्याने प्रवाशी आता संताप व्यक्त करत आहेत. रेल्वे स्थानकावरील गर्दी वाढत चालली आहे. रेल्वे पोलिसांनी 5-6 प्रवाशांना ताब्यात घेतले आहे. गोंधळ घालत असल्याने, चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून ताब्यात घेतले असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

सकाळपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या रस्त्यांवर आणि रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले. त्यामुळे वाहतूक व्यवस्था बंद झाली. घरी जाण्यासाठी प्रवाशांची लोकल पकडण्यासाठी धावपळ सुरू आहे. घाटकोपर रेल्वे स्थानकावर बदलापूर लोकल आली तेव्हा ही लोकल पकडण्यासाठी प्रवाशांनी एकच गर्दी केली. यावेळी प्रवासी एकमेकांच्या अंगावर पडले. चेंगराचेंगरीची घटना घडली. पण सुदैवाने कोणतीही अनर्थ घटना घडली नाही. इतर प्रवाशांनी खाली पडलेल्या लोकांनी उचललं. चेंगराचेंगरीमुळे अनेकांना त्रास झाला.

मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. मुंबई आणि उपनगरात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे मरे पुन्हा एकदा कोलमडली. दुपारी 12 नंतर मध्य रेल्वेची वाहतूक बंद झाली. सायन ते माटुंगा दरम्यान मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने वाहतूक बंद करण्यात आली. गेल्या 8 तासांपासून मरे ठप्प असल्याने प्रवाशी अडकून पडले आहेत. सकाळी कामावर आलेल्या चाकरमान्यांची घरी जाण्याची वेळ झाली आहे. त्यामुळे आता दादर आणि सीएसएमटी रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी उसळली आहे.