PKL 11: जयपूर पिंक पँथर्सने रविवारी नोएडा इनडोअर स्टेडियमवर पुणेरी पलटण विरुद्ध 30-28 अशी रोमहर्षक लढत जिंकून सलग तिसरा विजय मिळवला. अंकुश राठीच्या उच्च 5 आणि अर्जुन देशवालच्या 8 गुणांमुळे जयपूर पिंक पँथर्सला पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर झेप घेतली.
पूर्वार्धात वेगवान सुरुवात करणाऱ्या जयपूर पिंक पॅंथर्सने तोच जोश कायम ठेवून पुणेरी पलटणवर दबाव राखणे अपेक्षित होते. सहा मिनिटांतच लोण बसल्यावर पुणेरी पलटणकडून सामना संथ करण्याची अपेक्षा होती. मात्र, जयपूरने मोठी आघाडी लक्षात घेत सामना संथ केला. त्यात नंतर दोन्ही संघांनी तिसऱ्या चढाईत खेळण्याचे नियोजन केले. त्यामुळे सामना अधिकच संथ झाला. तिसऱ्या चढाईच्या चक्रात पलटणचे चढाईपटू अडकले. याचा फायदा घेत जयपूरची आघाडी कायम होती. मात्र, आकाश शिंदेच्या एका अव्वल चढाईने सामन्यातील रंगत वाढली होती. पण, निर्णायक क्षणी अर्जुन देशवालने मिळविलेले बोनस गुण आणि अखेरच्या सेकंदाला अंकुश राठीने केलेली पकड जयपूरसाठी निर्णायक ठरली. अंकुशने हाय फाईव्ह करताना सहा गुण कमावले. अर्जुने ८ गुणांची कमाई केली. पुणेरी पलटणकडून आकाश शिंदेचे ७ गुण वगळता अन्य चढाईपटू अपयशी ठरले. गौरव खत्री आणि अमन यांनी बचावात प्रत्येकी तीन गुणांची कमाई केली.
हे ही वाचा: सचिन तेंडुलकरला पाकिस्तानसाठी का करावी लागली होती फिल्डींग?
उत्तरार्धात सामन्याचे चित्र फारसे वेगळे दिसत नव्हते. जयपूर पिंक पॅंथर्सने सात ते आठ गुणांची आघाडी कायम राखली होती. मात्र, सामन्याच्या तिसाव्या मिनिटाला २३-१६ अशा पिछाडीवर असलेल्या पुणेरी पलटणला आकाश शिंदेच्या अव्वल चढाईने सामन्यात परतण्याची संधी दिली. या चढाईने गुणफल्क २३-१९ असा झाला आणि त्यानंतर लोण चढवत पलटणने सामना २४-२२ अशा निर्णायक वळणावर आणला. या क्षणापासून अखेरपर्यंत सामना दोन गुणांच्याच फरकाने जयपूरच्या बाजूने होता. मात्र, अखेरच्या १ मिनिटांत सामन्याचे चित्र २९-२८ असे दिसत होते. सेकंद सेकंदाच्या लढाईत पलटणने अखेरची चढाई मिळवली. मात्र, सामन्यात जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या अंकुश राठीने आकाशची पकड करुन निसटत चालेल्या सामन्यात जयपूर पिंक पॅंथर्सला ३०-२८ असा विजय मिळवून दिला.
पूर्वार्धाच्या खेळात पुणेरी पलटणच्या खेळाडूंना आपल्या लौकिकाला साजेसा खेळ दाखवता आला नाही. त्यांचे चढाईपटू चालले नाहीत आणि त्यांच्या बचावपटूंनाही म्हणावे तेवढे यश मिळवता आले नाही. सर्वाधिक चढाई गुणांच्या शर्यतीत असलेल्या अर्जुन देशवालच्या सुरुवातीच्या चढायांमुळे जयपूर पिंक पॅंथर्सने सहाव्याच मिनिटाला लोण चढवत ११-५ अशी मोठी आघाडी मिळवली आणि ती मध्यंतरापर्यंत कायम राखली. पुणेरी पलटणच्या पंकज मोहिते, आकाश शिंदे आणि मोहित गोयत या चढाईपटूंचे पूर्वार्धातील अपयश निश्चित चिंतेचे ठरले. या सत्रात त्यांना चढाईचे केवळ ४ गुण मिळवता आले. जयपूर पिंक पॅंथर्सने बचावातही चमक दाखवताना मध्यंतराला १९-१२ अशा आघाडीसह सामन्यावर नियंत्रण कायम राखले होते.