मुंबई : शिवसेना आमदार वर्षा बंगल्यावर बैठकीसाठी पोहोचले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांची वर्षावर बैठक होणार नाहीये. फक्त शिवसेना आमदाराच बैठकीला येणार आहेत. या बैठकीनंतर शिवसेनेचे 80% आमदार आजच रिट्रीत हॉटेलमध्ये दाखल होणार आहेत. तर मराठवाड्यातील आमदार 8 तारखेच्या औरंगाबाद सभेनंतर रिट्रीत हॉटेलात पोहचणार आहेत.
2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेच्या गोंधळा दरम्यान रिट्रीत हॉटेलात सेना आमदारांना ठेवण्यात आलं होतं. वर्षावरील शिवसेना आमदारांची बैठक झाल्यानंतर सर्व आमदारांना रिट्रिट हॉटेलला नेण्यासाठी बस वर्षावर आणण्यात आली आहे.
राज्यसभेचा खासदारांच्या निवडणुकीच्या सहा जागांसाठी एकूण सात उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे भाजव विरुद्ध महाविकासआघाडी अशी चुरस वाढलीये. भाजपचे 2 आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येणार असले तरी भाजपचा तिसरा आणि शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवारामध्ये सहाव्या जागेसाठी चुरस असणार आहे. त्यामुळे अपक्ष आमदारांवर सर्व काही अवलंबून असणार आहे.
दगा फटका होऊ नये म्हणून सर्व आमदारांना एकत्र हॉटेलमध्ये ठेवण्याचा महाविकासआघाडीने निर्णय घेतला आहे. यासाठी दोन्ही बाजुने जोरदार मोर्चेबांधणी सुरु झालीये.