मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर (Rajapur) तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारिसे (Journalist Shashikant Warise) यांचा संशयास्पद अपघाती (Accident) मृत्यू झाला. या प्रकरणाचे पडसाद आज विधीमंडळात उमटले. वारिसेंच्या हत्या प्रकरणी विरोधकांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाला राज्य सरकारने उत्तर दिलंय. शशिकांत वारिशे यांचा नाणार परिसरात (Nanar Project) जाणीवपूर्वक वाहन अपघात घडवून आणल्याची माहिती सरकारने दिलीय. सध्या या प्रकरणी एसआयटीची (SIT) चौकशी सुरू असल्याची देखील सरकारचं लेखी उत्तरात माहिती दिलीय. तर याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी चौकशी करून आरोपीवर शिक्षा करण्याची मागणी केलीय.
ठाकरे गटाचे आमदार अडचणीत
पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आलीय. वारिश हत्या प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या (MLA Rajan Salvi) अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. वारिशेंच्या हत्येप्रकरणी आरोपी पंढरीनाथ आंबेरकरला अटक करण्यात आलीय. हत्येच्या दिवशी आरोपी पंढरीनाथ आंबेरकर आणि साळवींचे पीए रोमेश नार्वेकर (Romesh Narvekar) यांचे संभाषण झाल्याची माहिती समोर आलीय. हत्येपूर्वी आणि हत्येनंतर पीएच्या मोबाईलवर कॉल झाल्याचे सीडीआर समोर आलंय. सीडीआर समोर आल्यानंतर पोलिसांनी 25 फेब्रुवारीला संबंधित पीएचा जबाब नोंदवलाय.
वारिसे यांच्या दुचाकीला कारची धडक
शशिकांत वारिसे नेहमीप्रमाणे कामानिमित्त राजापूरला गेले होते. अचानक त्यांच्या घरच्यांना त्यांचा अपघाताबाबत फोन आला. शशिकांत वारिसे राजापूर इथल्या पेट्रोलपंपावर आपल्या दुचाकीवर होते. यावेळी त्यांना वेगानं आलेल्या पंढरीनाथ आंबेरकर (Pandharinath Amberkar) याच्या थार गाडीची जोराची धडक मारली. त्यानंतर मंगळवारी उपचारादरम्यान त्यांचा कोल्हापूर इथं मृत्यू झाला. हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोपी वारीसे यांच्या नातेवाईकांनी आणि निकटवर्तीयांनी केला. त्याबाबतची तक्रार देखील पोलिसांकडे करण्यात आली.
बातमी लावल्याने वारिसेंचा घात?
पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यूला एक बातमी कारणीभूत ठरल्याचं बोललं जांतंय. ज्या दिवशी वारिसे यांचा अपघात झाला त्याच दिवशी त्यांनी एक बातमी प्रसिद्ध केली होती. वारिसे यांनी प्रसिद्ध केलेली बातमी हि रिफायनरी समर्थकांचे नेते म्हणून ओळख असलेल्या पंढरीनाथ आंबेरकर यांच्याबाबतची होती आणि याच पंढरीनाथ आंबेकर याच्या गाडीनं वारिसे यांच्या दुचाकीला धडक दिली. यानंतर पंढरीनाथ आंबेरकर फरार झाले. त्याला कणकवली इथून पोलिसांनी अटक केली.