गुवाहाटीतील बंडखोर आमदार अलर्टवर, भाजपचे आमदार मुंबईकडे रवाना

महाविकासआघाडी सरकारची अग्निपरीक्षा.

Updated: Jun 28, 2022, 11:23 PM IST
गुवाहाटीतील बंडखोर आमदार अलर्टवर, भाजपचे आमदार मुंबईकडे रवाना title=

मुंबई : राज्यातील महाविकासआघाडी सरकार अखेर कोसळण्याच्या मार्गावर आहे. राज्यपालांना भाजपने पत्र दिलं आहे. सरकारकडे बहुमत नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपालांकडून उद्या बोलवलं जाण्याची शक्यता आहे. राज्यपालांनी बोलवल्यानंतर जर ठाकरे सरकारने बहुमत असल्याचं सांगितलं तर अधिवेशन बोलवलं जाईल. त्यामुळे उद्धव ठाकरे हे उद्या काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास 50 आमदार असून त्यांना अलर्टवर ठेवण्यात आलं आहे. उद्या 12 वाजता ते गुवाहाटीवरुन निघणार आहेत. पण येथून ते कुठे जाणार याबाबत अजून कोणतीही माहिती पुढे आलेली नाही.

शिवसेनेचे 39 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता राज्यात सत्तासंघर्ष वाढला आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत जवळपास 50 आमदार असल्याचा दावा केलाय. त्यामुळे महाविकासआघाडी अल्पमतात आलं आहे.

एकनाथ शिंदे गटाला काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत राहायचे नाही. हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांना भाजपसोबत सरकार स्थापन करायचे आहे.

महाविकासआघाडीची आता उद्या महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील रननीती ठरवली जाणार असून कोर्टात जायचे की नाही यावर निर्णय घेतला जाणार आहे.

उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना परत येण्याचं आवाहन केलं आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.