काकांचा अंत्यविधी सुरु असताना आवाज आला 'बायकोचं मंगळसूत्र काढा'

घरातील दु:खद प्रसंगातही रुपाली चाकणकर यांनी राखलं विधवा प्रथा मोडण्याचं भान 

Updated: May 24, 2022, 06:11 PM IST
काकांचा अंत्यविधी सुरु असताना आवाज आला 'बायकोचं मंगळसूत्र काढा' title=
प्रतिकात्मक फोटो

मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील शिरोळा तालुक्यातील हेरवाड (Herwad) गावात विधवा प्रथा बंद करण्याचा क्रांतीकारक निर्णय नुकताच घेण्यात आला. या निर्णयाच्या अंमलबजावणीस सुरुवातही झाली आहे. हेरवाड गावचा हा आदर्श घेत राज्य सरकारनेही परिपत्रक काढून राज्यभर विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

या निर्णयाची अंमलबजावणी राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी सर्वात  प्रथम आपल्या कुटुंबातून केली आहे. रुपाली चाकणकर यांच्या संख्ख्या काकांचं दोन दिवसांपूर्वी रात्री निधन झालं. यावेळी रुपाली चाकणकर यांच्या काकूचे सौभाग्यलंकार न काढता, कुंकू न पुसता अंत्यविधी पार पडला.

विधवा प्रथा बंद व्हावी म्हणून महिला आयोगही प्रयत्नशील आहे. त्याप्रमाणे उक्ती आणि कृतीमध्ये कोणताही फरक न करता रुपाली चाकणकर यांनी स्वतःच्या घरामधून घालून दिलेला हा आदर्श निश्चितच कौतुकास्पद आहे.

तोंडात मणी द्या, मंगळसूत्र काढा...
रुपाली चाकणकर यांच्या काकांचा अंत्यविधी सुरु असताना कोणीतरी आवाज दिला बायकोच्या तोंडात मणी द्या, मंगळसूत्र काढा. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर उठून पुढे गेल्या आणि अंत्यविधीला उपस्थित असलेल्या व्यक्तिंना सांगितलं की, 'काकुच्या गळ्यातील मंगळसूत्र काढण्याचा कोणीही प्रयत्न करु नका. त्याऐवजी तुळशीचे पान त्यांच्या तोंडात द्या. आता अंत्यविधी करताना आपण बदल करायचा.' तात्काळ ग्रामस्थ आणि चाकणकर कुटुंबियांनी त्यांचं म्हणणं मान्य केलं. त्यानंतर रुपाली चाकणकर यांच्या काकुंचे कुंकू न पुसता, जोडवी न काढता आणि बांगड्या न काढता अंत्यविधी पार पडला. 

विधवांना सन्मानाने जगता यावे 
आपल्या जवळच्या व्यक्तीच्या जाण्याने अपार दुःख आणि मानसिक धक्का बसलेला असताना पतीच्या अंत्यविधीत पत्नीला मिळणारी वागणूक जास्त वेदनादायक असते. विधवा महिलांना समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत. या सामाजिक क्रांतीच्या विचारात एक पाऊल पुढे टाकताना आपणही सर्वजण सहभागी होऊ या, नव्या उषःकालासाठी असं मत यावेळी रुपाली चाकरण यांनी व्यक्त केली. 

कोल्हापुरातील हेरवाड गावने काही दिवसांपूर्वी विधवा प्रथा बंद करण्याचा क्रांतीकारक निर्णय घेतला आणि सर्वच स्तरातून या निर्णयाचे स्वागत करण्यात आलं. अगदी राज्य सरकारनेही लगेच परिपत्रक काढत हा निर्णय राज्यभर लागू केला. खरतर महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असल्याचे वारंवार सांगण्यात येतं. 

मात्र आजपर्यंत ही कुप्रथा सुरु होती. म्हणूनही काहीजणांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. दरम्यान उशीरा का होईना ही कुप्रथा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि सर्वच स्तरातून या निर्णयाचे जोरदार स्वागत झाले. दरम्यान अजूनही महिला आणि इतर बाबतीतही अनेक कुप्रथा सुरु अजूनही सुरु आहेत. त्यांना प्रतिबंध घालणं गरजेचं आहे.