मुंबई : हिरे व्यापारी राजेश्वर उदानी हत्याप्रकरणी दर दिवसाआड या घटनेसंबंधीचे नवे धागेदोरे समोर येत आहेत. उदानी यांच्या हत्येप्ररकरणी सचिन पवार याला घाटकोपर पंतनगर पोलिसांनी अटक केली. ज्यानंतर आता यामध्ये एका टेलिव्हिजन अभिनेत्रीचं नावही समोर येत आहे.
'स्टार प्लस' या वाहिनीवरील 'साथ निभाना साथिया' या मालिकेतील 'गोपी बहू' ही भूमिका साकारणारी अभिनेत्री देवोलिना भट्टचार्जी उदानी हत्या प्रकरणात अडचणीत आली आहे.
'एएनआय' या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार नवी मुंबईतील हिरे व्यापाऱ्याच्या हत्या प्रकरणी सचिन पवार आणि देवोलिना या दोघांनाही पंतनगर पोलीस चौकीकडून जबाब नोंदवण्यासाठी हजर होण्याचे आदेश देण्यात आले होते.
उदानी यांच्या हत्येप्रकरणी होणारा प्रत्येक उलगडा हा नवी रहस्य समोर आणत आहे, ज्यामध्ये आता देवोलिनाचं नावही पुढे येत असल्यामुळे कलाविश्वात बऱ्याच चर्चांना उधाण आलं आहे. इतकच नव्हे तर देवोलिना आणि सचिन एकमेकांना डेट करत असल्याचंही म्हटलं जात आहे, ज्यामुळे आता या तपासात नव्याने काही माहिती उघडकीस येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कोण आहे सचिन पवार?
काही दिवसांपासून सचिन पवार हे नाव बरंच चर्चेत आहे. सचिन पवार हा गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा माजी स्वीय सहायक होता. दरम्यान, खुद्द प्रकाश मेहता यांनी झी २४ तासशी बोलताना जर सचिन पवार दोषी आढळला तर भाजपात त्याला स्थान नसल्याचं सांगितलं.