मुंबई : राज्यसभा निवडणुकीत भाजपने तिसरा उमेदवार म्हणून कोल्हापूरचे ( Kolhapur ) धनंजय महाडिक ( Dhananjay Mahadik ) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. राज्यसभेच्या ६ जागा रिक्त असून एकूण ७ उमेदवार रिंगणात उतरल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. मात्र, या निवडणुकीत महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील असा विश्वास शिवसेना प्रवक्ते संजय राऊत ( Sanjya Raut ) यांनी व्यक्त केला आहे.
संभाजीराजे छत्रपती ( Sambhajiraje Chtarpati ) यांनी शिवबंधन बांधण्यास नकार दिला. त्यांचे वडील शाहू छत्रपती ( Shahu Chtarapati ) यांनी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fdnavis ) यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर राजकीय घडामोडींनी वेग घेतला. भाजपने धनंजय महाडिक ( Dhananjay Mahadik ) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. यावरून संभाजी छत्रपती यांना भाजपकडून कशाप्रकारे फसवण्याचा प्रयत्न केला जात होता, हे आता स्पष्ट झालं आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय.
भाजपला स्वतःचा उमेदवार या निवडणुकीत टाकायचाच होता. त्यांना घोडेबाजार करायचंच आहे. पण यासाठी छत्रपतींची ढाल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. पण, कोणी घोडेबाजार करुन अशा प्रकारे निवडणूक लढणार असेल तर सरकारचं सर्व घडामोडींवर बारिक लक्ष आहे, असा इशारा राऊत यांनी दिलाय.
शिवसेनेचा उमेदवार म्हणून संजय पवार ( Sanjay Pawar ) यांना आम्ही निवडणुकीत उतरवलं आहे. विजयासाठी जेवढी मतं हवीत त्या मतांचा कोटा शिवसेनेकडे ( Shivsena ) आहे. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार जिंकतील. शिवाय काँग्रेस ( Congress ) आणि राष्ट्रवादीचेही ( NCP ) उमेदवार विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजपनं स्वतःच्या स्वार्थासाठी, राजकारणासाठी संभाजीराजे छत्रपती यांचा दुरुपयोग केला, असा आरोप करून ते पुढे म्हणाले, महाविकास आघाडीतील धुसफूस वरुन होणाऱ्या आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही. काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री यांच्यात उत्तम संवाद आहे. तसेच, ज्यांच्यावर कोणतंही दबावतंत्र चालत नाही असे नेते म्हणजे उद्धव ठाकरे ( Uddhav Thackarey ) आहेत, असे त्यांनी स्पष्ट केलं.