मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातल्या बंगल्यावर मारहाण झाल्याचा आरोप एका तरुणाने केला आहे. या आरोपामुळे जितेंद्र आव्हाड वादात सापडले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. 'सोशल मीडियाचा वापर करून चिखलफेक करणं दुर्दैवी आहे. भाजप शासित राज्यांमध्ये त्यांच्या नेत्यांविषयी सोशल मीडियावरुन लिहिलं गेल्यास त्यांना थेट अटक करण्यात आली आहे, पण मी या मारहाणीचं समर्थन करत नाही,' असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी हा मुद्दा लावून धरला आहे. मारहाण झाल्याचा आरोप करणाऱ्या या तरुणाची भेट घेण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या निघाले होते, पण पोलिसांनी दोघांना मुलुंड टोलनाक्यावर अडवले. जिल्हाबंदीचं कारण देत पोलिसांनी दोघांना रोखलं. त्यामुळे टोलनाक्यावरुनच दोघांना परतावं लागलं.
भाजपच्या नेत्यांनी कोरोनासंदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचीही भेट घेतली. या भेटीमध्येही भाजप नेत्यांनी या मारहाणीचा मुद्दा उपस्थित केला.
गृनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर सोशल मीडियावरून अनंत करमुसे या ठाण्यातील तरुणानं अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना रविवारी दिवे लावण्याचं आव्हान केलं होतं. त्याची आव्हाड यांनी खिल्ली उडवली होती. त्यामुळे अनंत करमुसे याने आव्हाड यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर टाकला होता.
आव्हाड यांनी या तरुणाला पोलिसांकरवी बंगल्यावर बोलावले आणि त्यानंतर आव्हाड यांच्या समर्थकांनी अनंत करमुसे याला अमानुष आणि बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यामुळे भाजपनं या मुद्यावर आक्रमक होत जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे.