मुंबई : Sanjay Raut on BJP : राज्याच्या अर्थसंकल्प अधिवेशनाच्या (Maharashtra Budget Session 2022) पूर्वसंध्येला भाजपने हे अधिवेशन वादळी होईल, असा इशारा दिला होता. या इशाऱ्याला शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. हे अधिवेशन वादळी होणार नाही. आदळआपट करून वादळी अधिवेशन होत नसते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहेच, आमच्याकडे 170 ची ताकद कायम आहे. वादळ अडीच वर्षांपूर्वी आले, त्यात सगळे झोपले, असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे. (Sanjay Raut strongly criticized on BJP)
आमच्याकडे 170चा आकडा असताना कसलं वादळ निर्माण करणार, कुठेतरी फुंकर मारता त्यांना वाटत वादळ आले, अशी वादळ येत नाही. वादळ हे अडीच वर्षांपूर्वी आले. त्यांच्यामुळे सगळे झोपले ते अजून उठलेले नाहीत, असे संजय राऊत म्हणाले.
विरोधकांनी प्रश्न विचारावे. आपण संसदीय लोकशाही मानतो. दिल्लीतील राज्यसभेत संसदीय लोकशाहीला किंमत नसेल महाराष्ट्रातील विधानसभेला मोठी परंपरा आहे. त्यानुसार विरोधी पक्षाने काम करावे, असा सल्ला देण्यास संजय राऊत विसरले नाहीत.
राज्यातील मुख्यमंत्री हे राजकीय सामाजिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेत आहेत. भविष्यात ते महाराष्ट्रभर फिरतील. महाविकास आघाडी भक्कम करतील. चंद्रकांत पाटील हे कायमच बोलत असतात. यांना कोण विचारत नाही. ते बोलतात त्याला काय किंमत आहे. ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष असुन त्यांना काय किंमत आहे ते ओळखले पाहिजे, मला त्यांची कीव येते, असा टोला संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.