खुशखबर! स्टेट बँकेकेडून व्याजदरात पाचव्यांदा कपात

यंदाच्या आर्थिक वर्षात स्टेट बँकेने एमसीएलआरमध्ये केलेली ही पाचवी दरकपात आहे. 

Updated: Sep 9, 2019, 11:57 AM IST
खुशखबर! स्टेट बँकेकेडून व्याजदरात पाचव्यांदा कपात title=

नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या भारतीय स्टेट बँकेने पुन्हा एकदा एमसीएलआर अर्थात मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेटमध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे. स्टेट बँकेने एमसीएआर १० पैशांनी कमी केला आहे. त्यामुळे आता स्टेट बँकेचा एमसीएलआर ८.२५ टक्क्यांवरून ८.१५ टक्के इतका होणार आहे. 

१० सप्टेंबर २०१९ पासून नवे दर लागू होतील. १ मे पूर्वी स्टेट बँकेचा एमसीएलआर दर ८.५५ टक्के होता. यंदाच्या आर्थिक वर्षात स्टेट बँकेने एमसीएलआरमध्ये केलेली ही पाचवी दरकपात आहे. 

काही दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना सर्व प्रकारची कर्जे येत्या एक ऑक्टोबरपासून रेपो रेटशी जोडण्याचे आदेश दिले होते. रेपो दर कमी करूनही व्यापारी बँकांकडून हा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवला जात नव्हता.  याबाबत खुद्द गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी अनेकदा खंत व्यक्त केली होती. चालू वर्षांत रिझव्‍‌र्ह बँकेने १.१० टक्के रेपो दर कमी करूनही व्यापारी बँकांनी मात्र तुलनेत केवळ ०.४० टक्के दर कपातच केली आहे.

त्यामुळे रिझर्व्ह बँकेने कठोर पावले उचलत बँकांना हे आदेश दिले होते. यामुळे गृह, वाहन कर्जदार तसेच लघूउद्योगांना स्वस्तातील कर्ज उपलब्ध होणार आहेत. कर्जांवर मनमानी व्याजदार आकारणाऱ्या बँकांवर त्यामुळे निर्बंध येतील. यामुळे रेपो दर बदलाचा थेट लाभ कर्जदारांना होईल. ऑक्टोबर महिन्यातच दसरा आणि दिवाळी सारखे महत्त्वाचे सण असल्याने ऐन सणांच्या तोंडावर स्वस्त कर्जाची भेट कर्जदारांना मिळेल.