गुप्त मतदानामुळं वाढली मविआची धडधड, विधानपरिषद निवडणुकीची उत्सूकता वाढली

राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधानपरिषद निवडणुकीची उत्सूकता वाढली आहे.

Updated: Jun 11, 2022, 07:17 PM IST
गुप्त मतदानामुळं वाढली मविआची धडधड, विधानपरिषद निवडणुकीची उत्सूकता वाढली title=

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेवर धनंजय महाडिकांना निवडून आणत भाजपनं मविकास आघाडीला धोबीपछाड दिला आहे. एका बाजूला तीन तगड्या सत्ताधारी पक्षांची ताकद असतानाही, फडणवीसांनी अचून नियोजन करत विजय खेचून आणलाय. हा विजय म्हणजे विधानपरिषद निवडणुकीचा ट्रेलर मानला जातोय. त्यामुळे स्वाभाविकच सत्ताधाऱ्यांनाच चांगलीच धडकी भरली आहे. 

विधानपरिषद निवडणुकीची सत्ताधाऱ्यांना धडकी

तसं पाहिलं तर राज्यसभा निवडणूक असो वा विधानपरिषद निवडणूक, छोटे पक्ष आणि अपक्ष आमदार सहसा सत्ताधाऱ्यांच्या बाजुने मतदान करतात. मात्र फडणवीसांनी याला छेद देत मविआला चांगलाच दणका दिलाय. त्यात विधान परिषदेचं मतदान हे गुप्त पद्धतीनं होणार आहे. त्यामुळं मविआच्या गोटात धाकधूक वाढलीये. 

20 जूनला विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक होणार आहे.  

राज्यातील पक्षीय बलाबल पाहता भाजप-4, शिवसेना-2, राष्ट्रवादी-2 आणि काँग्रेसचे 2 उमेदवार निवडून येणं अपेक्षित आहे. विधानपरिषदेप्रमाणेच राज्यसभा निवडणुकीचा पॅटर्न आहे. विशेष म्हणजे विधानपरिषद निवडणुकीत गुप्त पद्धतीनं मतदान होतं. त्यामुळे शिवसेना, भाजप, काँग्रेसमधील नाराज आमदारांना आपल्या बाजूनं वळवण्यात फडणवीस यशस्वी होऊ शकतात. 

आधीच राज्यसभा निवडणुकीत शिवसेना नेत्यांनी केलेला आरोप अपक्षांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यात फडणवीसांची रणनीती कामी आली तर याचा मविआला मोठा फटका बसू शकतो. 

संजय राऊत चुकीचे बोलले, असंच ते बोलत राहिले तर विधानपरिषदेला वेगळा विचार करू असं अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी म्हटलं आहे.

राज्यसभा निवडणुकीत फडणवीसांनी जी खेळी यशस्वी करून दाखवली, तीच चुणूक ते विधान परिषदेतही दाखवतील, अशी चिन्हं आहेत. आम्ही लढण्यासाठी नव्हे तर जिंकण्यासाठी लढतो, असं त्यांनीच जाहीर केलंय. त्यामुळं विधानपरिषद निवडणूक होईपर्यंत राज्यकर्त्यांची झोप उडाली, तर आश्चर्य वाटायला नको.