मुंबई : राज्यसभा निवडणुकीत (Rajyasabha Election 2022) देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) सत्ताधारी महाविकास आघाडीला अस्मान दाखवलं. फडणवीसांनी असा धोबीपछाड डाव टाकला की, भाजपच्या तिन्ही उमेदवारांनी मैदान मारलं. शिवसेनेचा पैलवान चारी मुंड्या चीत झाला. फडणवीसांनी हा चमत्कार कसा घडवला?
राज्यसभा निवडणुकीच्या आखाड्यात अखेर भाजपनंच बाजी मारली. शिवसेनेच्या संजय पवारांना पराभवाची धूळ चारून भाजपचे पैलवान धनंजय महाडिकांनी मैदान मारलं. या विजयाचं श्रेय जातं ते अर्थातच देवेंद्र फडणवीस यांच्या डावपेचांना... शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासारखे दिग्गज समोर असतानाही फडणवीसांनी धोबीपछाड डाव टाकून सत्ताधारी महाविकास आघाडीला अस्मान दाखवलं.
या निवडणुकीत महाविकास आघाडीची 9 ते 10 मतं फुटली. देवेंद्र फडणवीसांनी करेक्ट प्लॅनिंग करून महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम केला.
1) छोट्या पक्षांना, अपक्षांना सोबत ठेवण्यात यश
फडणवीसांनी भाजपकडील अपक्षांना विश्वासात घेतलं आणि त्यांना सोबत ठेवलं. शिवाय सत्ताधारी आघाडीच्या गोटात असलेल्या अपक्षांना भाजपकडे वळवलं. आघाडीच्या संख्याबळाला सुरूंग लावला. हितेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीची 3 मतं आपल्याकडे खेचली. मनसेचा पाठिंबा मिळवला.
2) एका एका मतासाठी काटेकोर प्लॅनिंग
लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक हे भाजपचे आमदार गंभीर आजारी आहेत. त्यांना डॉक्टरांच्या सल्लानुसार सुरक्षितपणं मुंबईत आणून मतदान करून घेतलं.
3) राज्यसभेचं 'गणित' अचूक सोडवलं
भाजप उमेदवारांच्या विजयासाठी ४२ चा कोटा गृहित धरला तरी गोयल आणि बोंडे यांना अधिकची सहा मते मिळतील, अशी व्यवस्था केली. त्यांची अतिरिक्त मतं आणि दुस-या प्राधान्यक्रमाची मतं महाडिकांना द्यावीत, असं नियोजन केलं. आघाडीसोबत असलेल्या अपक्ष आणि छोट्या पक्षांची मतं फोडून जादा मतांची तजवीज केली.
त्यामुळंच की काय, राज्यसभा निवडणुकीतील भाजपचा विजय हा फडणवीसांनी घडवलेला चमत्कार आहे, असं खुद्द शरद पवारांनीच मान्य केलं.
याआधी बिहार आणि गोवा विधानसभा निवडणुकीतही फडणवीसांनी आपल्या नेतृत्वगुणांची कमाल दाखवत, भाजपला विजय मिळवून दिला होता. राज्यसभा निवडणुकीतील यशानं त्यांच्या नेतृत्वाला झळाळी आलीय.. आता विधान परिषदेत ते काय चमत्कार घडवतात, याची उत्सूकता सगळ्यांना आहे.