Sharad Pawar : महाविकास आघाडीची जुळणी कशी झाली, शिवसेना भाजप अंतर वाढण्यामागे नेमकी कारणं काय यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 'लोक माझे सांगाती' या पुस्तकात शरद पवार यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे शरद पवार यांच्या या पुस्तकाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. शिवसेना आणि भाजपची युती का तुटली? मविआचा जन्म कसा झाला? याबाबतही शरद पवार यांनी या पुस्तकात खुलासा केला आहे.
लोक माझे सांगाती या पुस्तकात शपद पवार यांनी 2019 मधील राजकीय घडामोडींवरथेट भाष्य केले आहे. मोदी, शाह, शिवसेना संबंधांवर पवारांनी अनेक खुलासे केले आहेत. महाविकास आघाडीची जुळणी कशी झाली यावर पवारांनी प्रथमच या पुस्तकात भाष्य केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे राजकीय आत्मचरित्र असलेल्या ‘लोक माझे सांगाती’चा हा दुसरा भाग आहे. 2 मे रोजी या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. प्रकाशनाआधीच हे पुस्तक चांगलेच चर्चेत आले आहे. या पुस्तकात त्यांनी शिवसेना भाजप युती आणि महाविकास आघाडी या विषयांवर भाष्य केले आहे.
शरद पवार यांच्या पुस्तकात नारायण राणे यांचा देखील उल्लेख त्यांनी केला आहे. नारायण राणे हे शिवसेनेच्या दृष्टीने गद्दार आहेत. मात्र, भाजपने याच नारायण राणे भाजपमध्ये घेत एक प्रकारे शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळले असल्याचे या पुस्तकात म्हटले आहे.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत यापूर्वी शिवेसना 171 आणि भाजप 117 जागा लढत असे. पण 2019नंतर चित्र बदलले. 2019मध्ये शिवसेनेने 124 जागा लढल्या. तर भाजपने 164 जागा पदरात पाडून घेतल्या. स्वत: च्या बळावर बहुमत मिळवत शिवसेनेचे ओझे उतरवून ठेवायचे असा चंग अतिआत्मविश्वासात दंग भाजपने बाळगला होता. नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोन्ही नेत्यांच्या देहबोलीतून आणि बोलण्यातून शिवसेनेविषयी फारशी सहानुभूती दिसली नाही. शिवसेनेच्या मात्र भाजपकडून अपेक्षा पूर्वीप्रमाणे कायम होत्या. शहरी भागात शिवसेनेची मोठी ताकद आहे. राज्यात वर्चस्व स्थापन करण्यासाठी शिवसेनेचा हिशोब करण्याचे प्रयत्न भाजपने सुरु केले. सत्तेत एकत्र असल्याने त्याचा उद्रेक झाला नाही. पण आग धुमसत होती. भाजप आणि शिवसेनेतील वाढलेले अंतर यामुळेच राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली.