ईडीची शरद पवारांवर कारवाई, शिवसेनेच्या पोटात गोळा

 शरद पवारांवरील ईडीच्या कारवाईमुळे शिवसेनेच्या पोटात गोळा आला आहे. 

Updated: Sep 26, 2019, 11:54 PM IST
ईडीची शरद पवारांवर कारवाई, शिवसेनेच्या पोटात गोळा title=
संग्रहित छाया

कृष्णात पाटील, मुंबई : अनेक मतदारसंघांमध्ये शिवसेनेचा राष्ट्रवादीशी सामना असल्याने शरद पवारांवरील ईडीच्या कारवाईमुळे शिवसेनेच्या पोटात गोळा आला आहे. ईडीच्या कारवाईमुळे शिवसेना सावध झाली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने शरद पवार यांच्यावर गुन्हा नोंदवणे हा एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेससाठी बूस्टर डोस ठरला आहे. पण या कारवाईचा सर्वाधिक धसका घेतला आहे तो शिवसेनेने.

दरम्यान, शरद पवार २७ तारखेला ईडी कार्यालयात जाणार आहे. तेही स्वत: उद्या दुपारी दोन वाजता. याला म्हणतात पवारांचा मास्टरस्ट्रोक. कसलेल्या फलंदाजाला फूलटॉस मिळाल्यावर तो थोडंच सोडणार. राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी शरद पवारांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीनं राज्यभर रान पेटवले आहे. अनेकांनी पक्षाला राम राम ठोकल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मरगळ आली होती. पण ईडीच्या कारवाईने पक्षाला नव्या उभारीची आयती संधी मिळाली आहे. 

शरद पवारांवरची कारवाई निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि राजकीय सुडबुद्धीतून केल्याचा प्रचार राष्ट्रवादी करत आहे. भाजप आणि राष्ट्रवादीच्या या लढाईत घायाळ झालीय ती शिवसेना. कारण भाजपापेक्षा शिवसेनेच्या थेट लढती राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात आहेत. म्हणूनच की काय कदाचित उद्धव ठाकरे सगळं सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची चांगली ताकद आहे. इथे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशा लढती होतायत. त्यामुळे भाजप राहिली बाजूलाच मधल्यामध्ये काटा  शिवसेनेचाच निघणार की काय, अशी भीती शिवसेनाला आहे.