दोन महिन्यांत दुसऱ्यांदा इंद्राणी मुखर्जी रुग्णालयात दाखल

मागच्या वेळी इंद्राणीला डोकं दुखू लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

Updated: Jun 2, 2018, 11:02 PM IST
दोन महिन्यांत दुसऱ्यांदा इंद्राणी मुखर्जी रुग्णालयात दाखल

मुंबई : बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिच्या छातीत दुखू लागल्यानं तिला मुंबईच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. रात्री जवळपास ११ वाजल्यानंतर छातीत दुखण्याची तक्रार केल्यानंतर तिला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सध्या इंद्राणी प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येतंय. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, तिची प्रकृती सध्या स्थिर आहे... परंतु, चाचण्या सुरु आहेत. 

उल्लेखनीय म्हणजे, दोन महिन्यांत दुसऱ्यांदा इंद्राणीला रुग्णालयात दाखल करावं लागलंय. मागच्या वेळी इंद्राणीला डोकं दुखू लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ड्रग्ज ओव्हरडोस घेतल्यानं तिला हा त्रास होत असल्याचं तेव्हा डॉक्टरांनी म्हटलं होतं. 

२४ एप्रिल २०१२ रोजी शीनाची हत्या करण्यात आली. ऑगस्ट २०१५ मध्ये इंद्राणीला शीनाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली. इंद्राणी, संजीव खन्ना आणि पीटर मुखर्जी यांच्यावर विशेष सीबीआय न्यायालयाने शीनाच्या हत्येचा कट रचून तिची हत्या केल्याचा आरोप निश्चित केला आहे. तसेच याशिवाय तिघांवर तिचे अपहरण करणे, त्यानंतर तिची हत्या करणे, गुन्ह्याबाबत खोटी माहिती देऊन दिशाभूल करणे आणि पुराव्यांची विल्हेवाट लावणे, असे मुख्य आरोप ठेवण्यात आले आहेत. तसेच शीनाचा भाऊ मिखाईल याच्या हत्येचा प्रयत्न करण्याचा कट रचल्याचा आरोपही ठेवण्यात आलाय.