मुंबई : मुंबईचे चाकरमानी कामावरून परतत असताना अचानक मान्सूनपूर्व पावसाची एन्ट्री झाली आणि मुंबईकरांची तारांबळ झाली. काही वेळातच मुंबई उपनगरात पावसाने आपला जोर वाढवला आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने आपली वर्दी दिली. उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या काहींनी या पावसाचा मनमुराद आनंद लुटला. मात्र कामावरून परतत असणाऱ्या चाकरमान्यांची मात्र या पावसाने दमछाक केली. काही भागात वीजपुरवठा देखील खंडीत झाला आहे.
मुंबईत आज संध्याकाळी पावसाचे जोरदार आगमन झाले. अनेक दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना या पावसाने दिलासा दिला आहे. हवेत गारवा निर्माण झाला आहे. पहिल्याच पावसामुळे मुंबईकर मात्र पावसात भिजण्याचा आनंद घेतांना दिसत आहे. तासभर सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं देखील समोर आलं आहे. कर्ला, बोरीवली, जोगेश्वरी, अंधेरी, पश्चिम उपनगरात पाऊस झाला.