ड्रग्जप्रकरणात शिंदे गटाच्या नेत्याचा जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप, पत्रकार परिषदेत फोटोच दाखवला

Drugs Mafia Lalit Patil : ड्रग्ज माफिया ललित पाटीलला अटक केल्यानंतर आता कारवाईला वेग आला आहे. याप्रकरणी एका माजी महापौराची चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यातच आता शिंदे गटाच्या नेत्यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 

कपिल राऊत | Updated: Oct 25, 2023, 05:30 PM IST
ड्रग्जप्रकरणात शिंदे गटाच्या नेत्याचा जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप, पत्रकार परिषदेत फोटोच दाखवला title=

Drugs Mafia Lalit Patil :  ड्रग्जप्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या (Shinde Group) प्रवक्त्या मनिषा कायंदेंनी जितेंद्र आव्हाडांवर (Jitendra Awhad) गंभीर आरोप केले आहेत. मुंब्र्यातील ड्रग्जमाफिया (Drugs Mafia) सलमान फाळकेसोबतचा फोटो दाखवत त्यांनी आव्हाडांवर निशाणा साधलाय. सलमान फाळकेसोबत फोटो कसा याचा खुलासा आव्हाडांनी करावा अशी मागणी कायंदेंनी केलीय. सलमान फाळकेकडे एमडी ड्रग्ज सापडलं होतं. ललित पाटील प्रकरणात दादा भुसे आणि शंभूराज देसाईंवर आरोप करणाऱ्यांनी आता उत्तर द्यावं असं मनिषा कायंदेंनी (Manisha Kayande) म्हंटलंय. 

सलमान फाळकेकडे 54 ग्राम एमडी ड्रग्ज सापडलं होता, याच सलमान फाळकेचे खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबरही फोटो आहेत. सुप्रिया सुळे संसदरत्न आहे, मग आरोपींसोबत फोटो कसे? असा ससवाल मनिषा कायंदे यांनी उपस्थित केला आहे. जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे यांनी याप्रकरणी उत्तर द्याव अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसंच  2020 मध्ये ड्रग्ज माफिया ललित पाटील हा उद्धव ठाकरे यांचा कार्यकर्ता होता. शिवबंधन बांधताना फोटो समोर आले होते असा आरोपही मनिषा कायंदे यांनी केला आहे. गृहमंत्र्यांनी यात लक्ष द्यावं, तसंच पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केलीय.

ललित पाटील प्रकरणी कारवाईला वेग
ड्रग्जमाफिया ललित पाटीलच्या कार प्रकरणी आता चौकशी सुरू झालीय. या प्रकरणी गुन्हे शाखेकडून एका माजी महापौराची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. ललित पाटीलची जुनी गाडी या नेत्याकडे होती. मात्र, प्रकरण अंगलट येत असल्याने ही गाडी रातोरात सात वर्ष जुनी दाखवली गेली. गॅरेज मालकाला प्रलोभन देत कारची जुनी हिस्ट्री तयार करण्यात आली. गाडीचे चारही टायर बदलण्यात आले. माजी महापौरांच्या सांगण्यानुसार, पाच वर्षांपासून बिल दिलं नाही म्हणून गाडी पडून असल्याचं गॅरेज मालकाने माध्यमांना सांगत या प्रकरणातून लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला. नेत्याचे ललित पाटीलशी संबंध चांगले असल्याने ड्रायव्हरला नोकरीला पाठवलं होतं. त्याच्या माध्यमातून आर्थिक देवाणघेवाण ही सुरू असल्याचा संशय नाशिक पोलिसांना आहे. त्यामुळे या प्रकरणात माजी महापौराची चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

ललित पाटीलचा व्हिडिओ
दोन दिवसांपूर्वी ललित पाटील याचा एक व्हिडिओ समोर आला होता.  ललित पाटीलने पुण्यातील ससून रुग्णालयात कसा प्रवेश मिळवला हे या व्हिडिओतून स्पष्ट झालंय. चाकण पोलिसांनी ड्रग तस्करी प्रकरणी 9 डिसेंबर 2020 ला ललितला अटक केली आणि दुसऱ्या दिवशी त्याला न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने त्याला 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली . मात्र दोनच दिवसांनी म्हणजे 12 डिसेंबर 2020 ला ललितने एक नाटक रचलं. पुण्यातील हिंजवडी पोलीस स्टेशनमधील वरच्या मजल्यावरून त्याला चौकशीसाठी खालच्या मजल्यावर नेलं जात असताना त्यानं जिन्यावरून पडल्याचं नाटक केलं . या सीसीटीव्हीमध्ये तो नाटकी पद्धतीनं जिन्यावरून पडताना दिसतोय . पडल्यामुळं त्याला आधी औंधमधील सरकारी रुग्णालयात आणि त्यानंतर लगेच ससून रुग्णालयात भरती करण्यात आलं. ससून रुग्णालयाने त्याच्यावर 17 तारखेपर्यंत उपचार केले आणि त्याला पुन्हा पोलिसांकडे सोपवलं. मात्र ललितने 18 डिसेंबरला पुन्हा पाय दुखल्याचं नाटक केलं आणि त्याला पुन्हा ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पुढं याच ससूनच्या यंत्रणेला हाताशी धरून ललितने ससून रुग्णालयातून ड्रग रॅकेट चालवायला सुरुवात केली.