'हिंदूंचे तारणहार म्हणून स्वत:चा उदोउदो करण्यासाठीच भाजपने CAB विधेयक आणले'

'जितं मय्या'च्या आवेशात जे लोक एकमेकांस पेढे भरवत आहेत त्यांची कीव करावीशी वाटते. 

Updated: Dec 13, 2019, 08:11 AM IST
'हिंदूंचे तारणहार म्हणून स्वत:चा उदोउदो करण्यासाठीच भाजपने CAB विधेयक आणले'

मुंबई: आपण जगभरातील हिंदूंचे एकमेव तारणहार आहोत, हे सिद्ध करण्याच्या ईर्षेतूनच भाजपने संसदेत नागरिकत्व सुधारणा विधेयक आणले, असा आरोप शिवसेनेने केला आहे. शिवसेनेने लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकाला (CAB) पाठिंबा दिला होता. मात्र, अवघ्या काही तासांमध्ये शिवसेनेने आपली भूमिका बदलून राज्यसभेत विधेयकावरील मतदानावेळी सभात्याग केला होता. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. 

या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत (CAB) मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. हे विधेयक मंजूर झाल्याबद्दल 'जितं मय्या'च्या आवेशात जे लोक एकमेकांस पेढे भरवत आहेत त्यांची कीव करावीशी वाटते. त्यांनी ईशान्येकडील राज्यांत अस्थिरतेची व अशांततेची चूड लावली. त्याचे परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागतील. जो आजार आयुर्वेद आणि योग पद्धतीने बरा करता आला असता त्यासाठी चिरफाड करून गडबड घडवली, अशी टीका शिवसेनेने केली आहे. 

तसेच नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या आडून हिंदुत्वाची भलामण करणाऱ्या भाजपने काश्मिरी पंडितांसाठी काय केले, असा सवालही अग्रलेखात विचारण्यात आला आहे. काश्मीरमधील अनुच्छेद ३७० हटवूनही काश्मिरी पंडितांची घरवापसी का होऊ शकली नाही, यावर सरकारकडे ठोस उत्तर नाही. काश्मीरमधील परिस्थितीही अजूनही सामान्य नाही. त्याच ईशान्यकेडील राज्यांमध्ये हिंसेचा उद्रेक झाला. हे विकतचे दुखणे घेऊन सरकार कसले राजकारण करत आहे, असा सवालही या अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.

या अग्रलेखात शिवसेनेने CAB संदर्भात राज्यसभेत भूमिका बदलण्यावरून भाजपकडून होत असलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेने राष्ट्रहिताची भूमिका घेतली. लोकसभेत पाठिेंबा दिला व राज्यसभेत विरोध केला, एका रात्रीत असे काय घडले?, हा प्रश्न विचारला गेला. मात्र, आम्हाला त्यांना असे विचारायचे आहे की, 'बंद खोलीतील' सत्य नंतर कसे विसरले जाते आणि शब्द क्षणात कसे फिरवले जातात? त्यामुळे 'बंद खोलीतील' सत्याचा सोयीस्कर विसर पडणाऱ्यांनी त्यांनी तरी एका रात्रीत काय घडले त्या अंधारात तीर मारू नये, असा टोलाही शिवसेनेने भाजपला लगावला आहे.