मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेनेला (Shiv Sena) पहिलं खिंडार पडलंय. शिवसेनेच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) शिंदे गटात दाखल झाल्या आहेत. काल त्यांनी नंदनवन या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्या बंगल्यावर जाऊन भेट घेतली. शीतल म्हात्रे शिंदे गटात जाणाऱ्या त्या मुंबईतील पहिल्या नगरसेविका आहेत.
शीतल म्हात्रे यांनी काही दिवसांपूर्वी अलिबागमध्ये शिंदे गटाला इशारा दिला होता. शिंदे गटाविरोधात आक्रमक भूमिका घेतलेल्या म्हात्रे यांनी आता भूमिका बदलली आणि शिंदे गटातच प्रवेश केला.
किशोरी पेडणेकर यांची टीका
शीतल म्हात्रे शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शीतल म्हात्रे म्हणजे उडत्या पंछी आहेत, त्या उडणारच, आधी मनसेत होत्या नंतर सेनेत आल्या आता कुठेही जातील, अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. पण ज्यांना जायचं त्यांनी जावं शिवसेना ही फिनिक्स पक्षासारखी आहे, असा विश्वासही किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला.
शिवसेनेत दोन गट झालेत ते एकत्र यावेत यासाठी यासाठी आज शिवसेना दीपाली सय्यद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावर बोलताना किशोरी पेडणेकर यांनी सगळेच आशावादी असल्याचं म्हटलं आहे.
उद्धव आणि आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेनाच मुंबई महापालिकेवर भगवा झेंडा फडकवणार असा विश्वासही किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला आहे.