मुंबई : राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शुक्रवार शेवटचा दिवस असताना शिवसेनेकडून कुणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी मंत्री दिवाकर रावते आणि काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या प्रियंका चतुर्वेदी या तिघांच्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा असून यापैकी कुणाची निवड होते याकडे लक्ष लागले आहे.
भाजपकडून तिसऱ्या जागेसाठी औरंगाबादचे माजी महापौर डॉ. भागवत कराड यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आता शिवसेनाही माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना पसंती देईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
औरंगाबादमध्ये सलग चारवेळा खासदार म्हणून निवडून गेलेले चंद्रकांत खैरे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एमआयएमच्या इम्तियाज जलिल यांच्याकडून पराभूत झाले.
हा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे. त्यातच भाजपनं भागवत कराड यांना उमेदवारी देऊन औरंगाबादमध्ये शिवसेनेसमोरचं आव्हान अधिक तगडं केलं आहे. त्यामुळे शिवसेनेकडून खैरे यांनाच प्राधान्य दिलं जाण्याची शक्यता आहे.
चंद्रकांत खैरे यांचं नाव पुढे असलं तरी आदित्य ठाकरे यांच्या आग्रहामुळे प्रियंका चतुर्वेदी यांचं नावही चर्चेत आहे. प्रियंका चतुर्वेदी या गेल्यावर्षी काँग्रेसमधून शिवसेनेत आल्या आहेत. आदित्य ठाकरे त्यांच्यासाठी आग्रही असल्याचं समजतंय. त्यामुळे आयत्यावेळी प्रियंका चतुर्वेदी यांचं नाव जाहीर होऊ शकतं.
शिवसेनेतलं तिसरं नाव आहे ते दिवाकर रावते यांचं. अनेक वर्षे विधान परिषदेचे आमदार राहिलेले दिवाकर रावते हे शिवसेनेचे पहिल्या फळीतले ज्येष्ठ नेते आहेत.
फडणवीस सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या रावते यांना ठाकरे सरकारमध्ये मात्र स्थान मिळू शकलेलं नाही. त्यामुळे मंत्रिपद नाही तर किमान राज्यसभेत जाण्याची त्यांची इच्छा असल्याचं समजतं.
पण शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खैरे, चतुर्वेदी आणि रावते यापैकी कुणाला पसंती देतात याची उत्सुकता आहे.