'अजित पवारांनीच शरद पवारांच्या राजकीय इस्टेटीला सुरुंग लावला आणि....'

'सामना'तून अजित पवारांवर घणाघात 

Updated: Nov 26, 2019, 08:06 AM IST
'अजित पवारांनीच शरद पवारांच्या राजकीय इस्टेटीला सुरुंग लावला आणि....'
'सामना'तून अजित पवारांवर घणाघात

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत असतानाच भाजपने 'शांतीत क्रांती'चा मार्ग अवलंबलेला असल्याचं पाहायला मिळत आहे. यात शिवसेना मात्र त्यांच्या शैलीत विरोधकांवर निशाणा साधत आहे. एकेकाळी युती असणाऱ्या भाजप नेत्यांचा पवित्रा पाहता 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रातून त्यांच्यावर शाब्दिक वार केले आहेत. अजित पवारांच्या भाजपला भावणाऱ्या 'खरेपणा'वरही अग्रलेखातून कटाक्ष टाकण्यात आला आहे. 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सत्तास्थापनेतील भूमिका पाहता त्यावर नाराजीचा सूर आळवत, 'एक भगतसिंग देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर; तर दुसऱ्यांनी लोकशाही आणि स्वातंत्र्यालाच वधस्तंभावर चढवलं', असं म्हणत यात फक्त त्यांचीच चूक नसून आमदारांचं अपहरण करणाऱ्या भाजपवर नाव न घेता निशाणा साधला. ही कसली चाणक्य चतुराई? असा थेट सवाल मांडत शिवसेनेची भूमिका सामनातूनही स्पष्ट केली. 

शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत जे काही कमावलं त्याचीच चोरी करत, 'मी नेता आणि माझा पक्ष' असं वागणं म्हणजे वेडेपणाचा कळस असल्याचं म्हणत अजित पवारांवरही सामनातून घणाघात केला. 'ईडी'च्या नावाखाली जेव्हा अजित पवार यांच्यावर राजकीय दबाव आणला गेला तेव्हा याच दबावाखाली येत त्यांनी शरद पवार यांच्या राजकीय ईस्टेटीलाच सुरुंग लावला आणि ते भाजपच्या वाटेला गेले. असं असतानाही अजित पवारांच्या 'खरेपणा'चंच भाजपला कौतुक, हे न रुचल्याचाच सूर अग्रलेखातून आळवला गेला. 

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज अंतिम फैसला 

'ऑपरेशन लोटस', नितीन गडकरी यांचं 'फिक्सिंग'चं वक्तव्य या साऱ्याचा संदर्भ देत राज्यातील राजकारणात कितीही उलथापालथ झाली तरीही बहुमताच्या बळावर  सत्याचाच विजय होईल असं म्हणत राज्यातील जनतेला शिवसनेकडून काळजी नसावी, असा विश्वास देण्यात आला आहे.