'सरकार बोलेना, इंधन दरवाढ थांबेना'; 'सामना' अग्रलेखातून उद्रेक

दर दिवशी इंधन दरवाढीचा फटका बसू लागला तर कसं होणार?

Updated: Jun 25, 2020, 07:49 AM IST
'सरकार बोलेना, इंधन दरवाढ थांबेना'; 'सामना' अग्रलेखातून उद्रेक  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : 'सरकार बोलेना, इंधन दरवाढ थांबेना', असा सूर आळवत शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या 'सामाना'तून दर दिवशी होणाऱ्या इंधन दरवाढीच्या मुद्द्याला वाचा फोडण्यात आली.  सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणाऱ्या इंधन दरवाढीचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून डोकं वर काढू पाहत होता. अखेर 'सामाना'च्या अग्रलेखातून त्याचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळालं. 

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये होणारी विक्रमी वाढ यामध्ये अधोरेखित करण्यात आली आहे. शिवाय बुधवारी दिल्लीमध्ये disel डिझेलच्या दरांनी petrol पेट्रोलच्याही दरांना मागे टाकल्याची बाब मांडत देशात सुरु असणारी इंधन दरवाढ सरकारच्या पथ्यावर पडत असली तरीही त्याचा फटका मात्र सर्वसामान्यांनाच बसत असल्याचं अग्रलेखातून म्हणण्यात आलं. 

बुधवारी दिल्लीमध्ये पेट्रोलच्या दरांमध्ये कोणतीही वाढ झाली नाही. पण, डिझेलचे दर मात्र ४८ पैशांनी वाढले. ही दरवाढ पाहता पेट्रोल ७९.७६ आणि डिझेल ७९.८८ (प्रति लीटर) रुपयांवर पोहोचलं. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच डिझेलच्या दरांनी पेट्रोलच्या दरांना मागे टाकल्याची घटना घडली. त्यामुळं सहाजिकच अनेकांचे डोळे विस्फारले. 

एकिकडे देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे, तर दुसरीकडे इंधन दरवाढीचं हे सत्रही थांबण्याचं नाव घेत नाही आहे. मुख्य म्हणजे यामध्ये किमान कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी (केंद्र) प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. पण, या दरवाढीबाबत मात्र हाताची घडी, तोंडाला कुलूप अशीच त्यांची भूमिका दिसत आहे असं म्हणत महत्त्वाच्या मुद्दयावर अग्रलेखातून प्रकाशझोत टाकण्यात आला. 

अनलॉकच्या सत्राची सुरुवात झाली असली तरीही आजमितीस लाखो हातांना काम नाही हे वास्तव मांडत वाढत्या महागाईमुळं आणखी एक संकट सर्वसामान्यांपुढं उभं ठाकलं असल्याचं अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे. मुख्य म्हणजे कोरोनाचं संकट, महागाई आणि ही इंधन दरवाढ असे त़डाखे दररोद बसू लागले तर, निभावणार कसं असा सवालही सामातून उपस्थित करण्यात आला.

कोरोना काळात केंद्राकडून जाहीर करण्यात आलेल्या कोट्वधींच्या आर्थिक पॅकेजच्या माध्यमातून सामान्यांच्या खिशात पैसे दिल्याचं सांगितलं जात असतानाच पेट्रोल- डिझेलची दरवाढ करत दुसऱ्या मार्गानं हे पैसे काढूनही घेण्याच्या सरकारच्या भूमिकेवर शिवसेनेकडून टीका करण्यात आली. 

 

सध्याच्या घडीला सरकारच्या तिजोरीवर असणारा बोजा सर्वमान्य आहे. पण, त्यासाठी सातत्यानं होणारी इंधन दरवाढ हा काही एकमेव पर्याय नाही, अशा तिखट सूरात सरकारपुढं दरवाढीला आळा घालण्याची मागणी अग्रलेखातून करण्यात आली आहे.