'अन्वय यांच्या कुटुंबाचा आवाज दडपणं हे हाथरसपेक्षा भयंकर'

अर्णब गोस्वामींचे समर्थन करणाऱ्या भाजप नेत्यांवर सामनातून टीका 

Updated: Nov 8, 2020, 08:10 AM IST
'अन्वय यांच्या कुटुंबाचा आवाज दडपणं हे हाथरसपेक्षा भयंकर' title=

मुंबई :  मृत अन्वय नाईक, त्यांची पत्नी, मुलगी यांचा आवाज दडपण्यात आला. हे प्रकरण निर्भयापेक्षा, हाथरसकांडापेक्षा भयंकर असल्याची टीका सामनातून भाजपवर करण्यात आली आहे. अन्वय नाईक आत्महत्या (Anvay Naik Sucide Case) प्रकरणात आरोपी असणाऱ्या अर्णब नाईक यांना पाठीशी घालणाऱ्या भाजप नेत्यांवर सामनातून निशाणा साधण्यात आलाय. 

अर्णब गोस्वामी (Arnab Goswami Arrested) यांनी मुंबईतील एका मराठी उद्योजकाचे पैसे बुडवले. त्या तणावातून अन्वय नाईक आणि त्याच्या वृद्ध आईने आत्महत्या केली. हा गंभीर गुन्हा असून तो आधीच्या भाजप सरकारने दाबला. त्या दडपलेल्या गुन्ह्याची पुन्हा चौकशी करणे हा अपराध आहे का? पोलिसांनी गोस्वामी यांना अटक केली हा वृत्तपत्र स्वातंत्र्यावर कसा हल्ला होऊ शकेल?  असा प्रश्न सामनातून उपस्थित करण्यात आलाय.

सरकारच्या विरोधकांवर टीका करणाऱ्यांचे गुन्हे माफ झाले. त्यांची आर्थिक ताकद जणू गंगेतून शुद्ध होऊनच आली आणि इतरांच्या मागे ईडी, सीबीआयचा ससेमिरा लावला. हासुद्धा वृत्तपत्र स्वातंत्र्यावर हल्लाच असल्याचे सामनात म्हटलंय. 

चारित्र्यहनन, चिखलफेक, अफवांचा प्रसार करणे हा वृत्तपत्रांचा, मीडियाचा धंदा बनला असेल तर त्यास सरकारसह सर्वच राजकीय पक्ष जबाबदार असल्याचे सामनात म्हटलंय. लाचार पत्रकारांचे टोळके भोवती गोळा केल्याने नेते मोठे होत नाहीत. आज तेच चालले आहे. खुनाच्या आरोपाखाली अटक झालेल्या पत्रकाराच्या समर्थनासाठी पेंद्रीय मंत्री उभे राहतात. राजकीय पक्षाचे लोक रस्त्यावर आडवे पडतात. अक्षता नाईक व आज्ञा नाईक यांनी न्यायासाठी घातलेली साद त्यांच्या कानावर प्रहार करीत नाही, हे अमानुष असल्याचे सामनातून म्हटलंय. 

निर्भया मेल्यावर तांडव करणारे लोक अन्वय नाईक यांच्या वारल्यावरही उभे राहायला तयार नाहीत. स्वातंत्र्य धोक्यात आल्याची आवई ते उठवत आहेत. हे स्वातंत्र्य चिखलफेक आणि बदनामी करण्याचं आहे. त्यामुळे राजकारण आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याचे गटार झाल्याची भूमिका सामना संपादकीयतून मांडण्यात आलीय.