Mumbai Drug Case : बॉलीवूड बदनाम झालं तर हे देशाचंही नुकसान - नवाब मलिक

NCBच्या बॉलिवूडवरील कारवाईबाबत मुख्यमंत्री, पंतप्रधानांना पत्र लिहिणार

Updated: Oct 26, 2021, 10:04 PM IST
Mumbai Drug Case : बॉलीवूड बदनाम झालं तर हे देशाचंही नुकसान - नवाब मलिक

मुंबई : मुंबई ड्रग्स प्रकरणात (Mumbai Drug Bust Case) एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यातच एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या कथित पत्रात समीर वानखेडे यांच्या 26 फ्रॉड केसेसचा उल्लेख असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा चौकशी करण्याची मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

यासंदर्भात नवाब मलिक यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांची भेट घेतली. याप्रकरणी त्यांच्याकडे एसआटीची (SIT) चौकशीची मागणी केल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. पोलीस विभाग या प्रकरणाचा तपास करत आहे, तपास करुन त्याच्यावर गुन्हा दाखल होईल असं आश्वासन देण्यात आल्याचंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. एफआयआर दाखल झाल्यानंतर किरण गोसावीसारखी माणसं कसे पैसे उकळत आहेत, हे तपासात समोर येईल, असं मलिक यांनी म्हटलं आहे.

याप्रकरणतील एका पंचाने समोर आणलेला प्रकार धक्कादायक आहे, मी आरोप करत होतो, त्यात भर टाकणारा हा प्रकार आहे. एफआयआर व्यक्तीच्या विरोधात नाही तर त्या घटनेविरोधात होईल, यात दोषींवर पोलीस कारवाई करतील, कुणाला सूडबुद्धीने अडकवण्याची भूमिका नाही, पण पंचाचा जो अॅफेडेव्हिट आहे त्यातून बरंच काही समोर आलं आहे, त्याचा तपास होईल, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

बॉलिवूडला बदनाम करण्याचा डाव

बॉलीवूड (BollyWood) हॉलीवूड नंतर जगातील एक मोठी इंडस्ट्री आहे, लाखो लोकांचा त्यावर रोजगार आहे. बॉलीवूड या देशातील संस्कृती जगभर पोहचवत आहे, देशातल्या GDP त तीन ते चार टक्के वाटा बॉलीवूडचा आहे. ज्या पद्धतीने बॉलीवूडला बदनाम करण्याचं कारस्थान चाललं आहे, त्याचा परिणाम केवळ पाच दहा कलाकारांवर होणार नाही, तर लाखो लोकांचा रोजगावर यावर आहे, आणि बॉलीवूड बदनाम झालं तर हे देशाचं पण नुकसान होणार आहे, याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी पंतप्रधानांना पत्र लिहिणार आहे. महाराष्ट्रात वर्षभरात जो काही घटनाक्रम सुरु आहे, बॉलीवूड इंडस्ट्रीच्या बाबतीत जी चिंता व्यक्त केली आहे ती मुख्यमंत्री पंतप्रधानांना कळवतील, असंही नवाब मलिक यांनी माहिती दिली आहे.