मुंबई: सियाचीन, डोकलाम यासारख्या उंचावरच्या (High Altitude) ठिकाणांवर तैनात असलेल्या भारतीय सैनिकांना पुरेशा सुविधा मिळत नसल्याचे 'कॅग'च्या अहवालातून स्पष्ट झाल्यानंतर राजकीय वादाला सुरुवात झाली आहे. केंद्र सरकार भारतीय सैनिकांना व्यवस्था पुरवण्यात कुचराई करत आहे. 'कॅग'च्या अहवालाने भाजपच्या फसव्या राष्ट्रभक्तीचा बुरखा फाटला आहे, अशी जळजळीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केली.
ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, कॅगच्या अहवालामुळे केंद्र सरकारचा सैनिकांच्या सुविधांकडे अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आले आहे. भाजपचे नेते देशभक्तीच्या बाता मारून जनतेची फसवणूक करतात. मात्र, कॅगच्या अहवालामुळे भाजपचा खोट्या राष्ट्रभक्तीचा बुरखा फाटल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले.
तत्पूर्वी 'कॅग'ने सादर केलेल्या अहवालातून अनेक गंभीर गोष्टी समोर आल्या आहेत. सियाचीन, डोकलाम यासारख्या उंचावरच्या (High Altitude) ठिकाणांवर तैनात असलेल्या भारतीय सैनिकांना योग्य कॅलरीज असलेले जेवण मिळत नाही. तसेच याठिकाणी राहण्यासाठी आवश्यक असलेले कपडेही त्यांना पुरवले जात नाहीत. येथील सैनिक जुनी हत्यारे, उपकरणे आणि उपकरणे वापरत असल्याचे कॅगच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे सैनिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत असल्याचेही 'कॅग'ने अहवालात म्हटले आहे.