Pro Kabaddi League: हरियाना स्टिलर्सचा पुणेरी पलटणवर ३८-२८ असा दणदणीत विजय! ठरली एकतर्फी लढत

Haryana Steelers vs Puneri Paltan: प्रो कबड्डी लीगमध्ये बुधवारी हरियाना स्टिलर्सने गतविजेत्या पुणेरी पलटणवर  ३८-२८ असा दहा गुणांनी दणदणीत विजय मिळविला. 

तेजश्री गायकवाड | Updated: Nov 28, 2024, 07:07 AM IST
Pro Kabaddi League: हरियाना स्टिलर्सचा पुणेरी पलटणवर ३८-२८ असा दणदणीत विजय! ठरली एकतर्फी लढत title=

PKL 11: शिवम पठारेचे चढाईतील सुपर टेन आणि महंमद रेझा शाडलुईचे बचावातील हाय फाईव्ह अशा जबरदस्त खेळाच्या जोरावर प्रो कबड्डी लीगमध्ये बुधवारी हरियाना स्टिलर्सने गतविजेत्या पुणेरी पलटणवर  ३८-२८ असा दहा गुणांनी दणदणीत विजय मिळविला. या विजयाने हंगामातील पहिल्या सामन्यातील १० गुणांनी झालेल्या पराभवाची हरियाना स्टिलर्सने परतफेड केली. त्याचबरोबर गुणतालिकेतील आघाडीचे स्थान भक्कम केले. 

 

कशी झाली सामन्याची सुरुवात? 

पहिल्या मिनिटापासून स्विकारलेले आक्रमण धोरण, मध्यंतराला मिळविलेली मोठी आघाडी आणि या सर्वाचा फायदा करुन घेत उत्तरार्धात धोका न पत्करता केलेला खेळ असे हरियाना स्टिलर्सच्या आजच्या खेळाचे वैशिष्ट्य राहिले. लीगमध्ये बचावाच्या आघाडीवर हरियाना स्टिलर्स आणि पुणेरी पलटण दोन्ही संघाची ताकद भक्कम होती. मात्र, आज पलटणचे बचावपटू साफ अपयशी ठरले. हेच त्यांच्या पराभवाचे कारण ठरले. संपूर्ण सामन्यात मिळविलेल्या २८ गुणांतील १९ गुण पलटणसाठी चढाईतून आले. यातील ११ गुण एकट्या पंकज मोहितेचे होते. त्याला कुणाचीच साथ मिळाली नाही. आकाश शिंदे ६ गुण मिळवू शकला. बचावात पलटणला केवळ पाच गुण मिळवता आले. तुलनेत हरियानाकडून शिवम पठारेने चढाईत १३ आणि शाडलुईने बचावात ५ गुणांची कमाई करून आपली छाप पाडली. त्यांना विनय (४), नविनकुमार (३) यांची साथ मिळाली. 

 हे ही वाचा: IND Vs AUS: रोहित शर्मासाठी कोण बलिदान देणार? ऑस्ट्रेलिया मालिकाच्यामध्ये 'या' सामन्यात मिळेल उत्तर

उत्तरार्धात खेळ कसा रंगला? 

उत्तरार्धाला खेळायला सुरुवात झाली तेव्हा हरियाना स्टिलर्सने मध्यंतरातील मोठ्या आघाडीचा फायदा घेण्याचा फायदा उठविण्याचे नियोजन केल्याचे दिसून आले. फारसा धोका न पत्करता स्टिलर्सच्या चढाई आणि बचावपटूंनी संघाचा गुणफलक हलता ठेवला. दुसरीकडे पलटणला दोन्ही आघाड्यांवर झगडावे लागत होते. शिवमने चढाईत पंकज मोहितेला बाद केल्यामुळे पलटणवर आणखी दबाव वाढला. आकाश शिंदेचीही पकड झाली. मोहित गोयतही प्रभावहीन ठरला. हरियानासाठी महंमद रेझा शाडलुई, शिवम पठारे आज गुणांचे मशीन ठरले. मोहितच्या अपयशामुळे पलटणने व्ही अजितला मैदानात उतरवले. पण, तोही शाडलुईच्या कचाट्यातून सुटू शकला नाही. उत्तरार्धातील दुसऱ्या टप्प्यात मोठी आघाडी कायम राखल्याने हरियाना स्टिलर्सच्या चढाईपटूंनी वेळ काढण्याचे नियोजन करत विजय निसटणार नाही याची पूरेपूर काळजी घेतली. बचावात शाडलुईला टाळणे पलटणच्या चढाईपटूंना जमलेच नाही. 

 हे ही वाचा: IPL: आयपीएल सामना गमावल्यास मालकांचे किती नुकसान होते? जाणून घ्या

 हे ही वाचा: तुमचा आवडता खेळाडू यंदा कोणत्या संघात? बघा IPL 2025चे संघ आणि खेळाडूंची यादी

पूर्वार्धात काय झाले? 

पूर्वार्धात हरियाना स्टिलर्सने पहिल्या मिनिटापासून आक्रमकता दाखवून आपले मनसुबे स्पष्ट केले. पहिल्या एक मिनिटांतच त्यांचे आकाश आणि मोहित गोयत हे दोन चढाईपटू बाद झाले. या दरम्यान विनयने पहिल्याच चढाईत गुण मिळवला. विनयला बाहेर ढकलण्याचा पलटणच्या अबिनेश नंदराजनचा प्रयत्न फोल ठरला. त्यानंतर शिवम पठारेला रोखणे पलटणच्या बचावफळीला जमलेच नाही. मोहित गोयत आणि आकाश शिंदेही चमकू शकले नाहीत. त्यामुळे पाच मिनिटांतच त्यांना लोण स्विकारावा लागला. कर्णधार पंकज मोहितेच्या चढाईतील गुणांच्या जोरावर पलटणने आपले मोहिम कायम राखली होती. पहिल्या टप्प्यात बचावातील पहिला गुण मिळविण्यासाठी पलटणला तब्बल १३ मिनिटांची वाट बघावी लागली होती. त्यामुळे मध्यंतराला हरियाना स्टिलर्सने २२-१४ अशी मोठी आघाडी घेतली. चढाईत दोन्ही संघांनी प्रत्येकी ११ गुणांची कमाई केली. पण, बचावात हरियाणा खूप पुढे राहिले. त्यांनी ७ गुणांची कमाई केली होती, तर पलटणला बचावात केवळ दोनच गुण मिळवता आले होते.