मुंबई : १ जून रोजी घोषित केलेली वेतनवाढ कर्मचाऱ्यांना मान्य नसेल तर ती रद्द करण्यात यावी आणि औद्योगिक न्यायालय जो निर्णय घेईल तो कर्मचाऱ्यांनी मान्य करावा. १ जून रोजी केलेली दरवाढ रद्द झाली तर एसटीची भाडेवाढ देखील करावी लागणार नाही, एसटी महामंडळाचा दिवाकर रावते यांच्याकडे प्रस्ताव आलाय. यावर काय निर्णय होणार याकडे लक्ष लागलेय. दरम्यान, एसटी परिवहन महामंडळ संघटनेने पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर सरकारने अधिसूचना जाहीर केलीय. प्रवासी वाहतुक सुरळित ठेवण्यासाठी सरकारने काही उपाय योजना या अधिसुचनेच्या माध्यमातून सुचवल्या आहेत..त्यानुसार राज्यातील सर्व खाजगी वाहातूक बसेस, स्कुल बसेस, कंपनी मालकीच्या बसेस, मालवाहु वाहन यांना प्रवासी वाहातूक करण्याची मान्यता या अधिसुचनेच्या माध्यमातून देण्यात आली आहे. संप मागे घेतल्यानंतर ही अधिसूचना रद्द होणार आहे
आज दि. ८ जून रोजी सुरू झालेल्या अघोषित संपामुळे एसटीचे सुमारे १५ कोटी रुपयाचं महसूल बुडाला आहे. दिवसभरात महाराष्ट्रातील २५० आगारातून सुमारे ३० % रा. प. बसच्या फेऱ्या सुटल्या, राज्यातील २५ आगार पूर्ण क्षमतेने चालू होते. तसेच १४५ आगारामध्ये अंशतः वाहतूक सुरु होती. तसेच राज्यातील ८० आगारातून दिवसभरात एकही रा.प. बसची फेरी बाहेर पडली नाही. या संपाचे परिणाम मुख्यत्वे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, या जिल्ह्यात मोठया प्रमाणात जाणवत आहे. तुलनेने मराठवाडा आणि विदर्भा मध्ये ६०% वाहतूक सुरु होती. संध्याकाळी ४ वाजेपर्यंत होणाऱ्या ३५,२४९ बस फेऱ्यांपैकी १०,३९७ फेऱ्या सुरळीत सुरु होत्या.
एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या न्याय मागण्यांकरिता संप पुकारलाय. आता एसटी प्रशासन सूडबुद्धीने कारवाई करत असेल तर ते सहन केलं जाणार नाही. कर्मचाऱ्यांच्या पाठिशी संघटना ठामपणे उभी राहील असं सांगत दडपशाही सहन केली जाणार नाही असा इशाराही एसटी कामगार संघटनेकडून देण्यात आलाय.
एसटी कर्मचा-यांनी मध्यरात्रीपासून कामबंद आंदोलन पुकारलंय. एसटी कर्मचा-यांचा हा अघोषीत संप आहे. कर्मचा-यांच्या कोणत्याही संघटनेने संपाची हाक दिलेली नाही. राज्यातील अनेक ठिकाणी संपाचा परीणाम जाणवतोय. मुंबईत कुर्ला आणि परळ स्थानकातून गाड्या निघाल्या नाहीत. तर मुंबई सेंट्रल आणि पनवेलमधून गाड्या निघाल्या आहेत. उरणमधूनही गाड्या निघाल्या नाहीत. सांगली जिल्ह्यात एस टी सेवा विस्कळीत झाली आहे. बार्शी इथंही सर्व कर्मचारी संपावर आहेत. तर सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर, करमाळा इथही काही प्रमाणात एसटी बंद आहेत. रायगड जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद आहे. कर्जत, माणगाव आगार वगळता अन्य आगारातून अल्प प्रमाणात बस सेवा सुरू आहे. संपामुळे प्रवाशांची गैरसोय होतेय.
एस टी कर्मचारी संपात सहभागी झाल्या प्रकरणी यवतमाळ जिल्यातील एकूण ९ आगारातील ४६ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. वणी आगार- ५ चालक, ३ वाहक , १ वाहन परीक्षक पुसद आगार- २ चालक , ७ वाहक पांढरकवडा आगार- १३ चालक, १३ वाहक नेर आगार - १ चालक ,१ वाहक असे एकूण ४६ जनावर कारवाई केली गेली आहे. वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे, कामबंद आंदोलन करणे याबाबत ही कारवाई करण्यात आलेय.