मुंबई : राज्यात गेल्या चौदा दिवसांपासून विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी एसटी कर्मचारी शिष्टमंडळ आणि परिवहन मंत्र्यांमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. सह्याद्रीवर पार पडलेली ही बैठक सकारात्मक झाल्याची माहिती समोर येत आहे.
परिवहन मंत्री आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळात चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या. या बैठकीनंतर अनिल परब प्रस्ताव घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे रवाना झाले आहे. या भेटीनंतर संध्याकाळी 6 वाजता पत्रकार परिषद होणार असून यात अनिल परब महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता आहे.
सह्याद्रीवरील बैठकीत पगारवाढीवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. कालच सरकारने अंतरिम पगारवाढीचा प्रस्ताव ठेवला होता. यावर चर्चा करुन आज पुन्हा एसटी कर्मचारी आणि अऩिल परब यांची बैठक झाली.
विलीनीकरणाच्या मुद्दयावरही या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. एसटी कर्मचाऱ्यांचं 10 जणांचं शिष्टमंडळ बैठकीला तसंच
आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत बैठकीला उपस्थित होते.