अहमदनगर: राज्यातील अनेक प्रस्थापित राजकीय घराण्यांतील नव्या पिढीचे शिलेदार यंदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आपल्या वाडवडिलांच्या ताकदीवर हे नवे शिलेदार निवडून येण्याची खात्री असली तरी प्रचारादरम्यान त्यांच्याकडून होत असलेल्या चुकांमुळे ते टीकेचे धनी ठरत आहेत. अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचे नुकतेच झालेले भाषण आणि स्टंटबाजी अनेकांच्या टीकेचा विषय ठरली होती. पार्थ यांच्यानंतर सुजय विखे-पाटीलही या पंगतीत येऊन बसले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला त्यांचा एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
राहुरी तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते आणि जिल्हापरिषद सदस्य शिवाजी गाडे यांचे मंगळवारी हद्यविकाराच्या झटक्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बारागाव नांदुर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यावेळी सुजय विखे यांचा मृतदेहास हार घालताना आणि कॅमेऱ्यात बघतानाचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने विखेंवर टीका होत आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातुन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या संजीव भोर यांनीही फेसबुकवर पोस्ट टाकत विखे यांच्यावर 'टाळुवरचं लोणी खाण्यासाठी उत्तरेतून दक्षिणेत आलेत का हे महाभाग?' अशी टीका केली.
दरम्यान, सुजय विखे-पाटील यांच्या समर्थकांकडूनही या टीकेला प्रत्युत्तर देण्यात आले आहे. शिवाजी गाडे यांच्या निधनाच्या दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी वाजतगाजत मिरवणूक काढून अर्ज दाखल केला. अगदी आदल्या दिवसापर्यंत शिवाजी गाडे संग्राम यांच्या खांद्याला खांदा लावून प्रचार करत होते. मात्र, तरीही गाडे यांच्या निधनानंतर संग्राम जगताप वाजतगाजत उमेदवारी अर्ज भरायला गेले, अशी टीका अनेकांनी केली.