जावेद मुलानी, झी मीडिया, मुंबई : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट करून घ्या या मागणीसाठी सोमेश्वर कारखान्याच्या( Someshwar Sugar Factory) 45 सभासदांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. कोर्टाने दिलेला हा निर्णय विरोधी पक्ष नेते अजित (Ajit Pawar) आणि माळेगाव कारखान्याच्या संचालक मंडळाला हा एक प्रकारचा धक्का मानला जात आहे.
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातून बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील दहा गावे वगळून माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जोडण्याचा विषय कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला होता. मात्र, या निर्णयाला माळेगावच्या सभासदांनी तीव्र विरोध दर्शविला तरी देखील संचालक मंडळाने प्रोसिडिंग लिहून प्राथमिक सहसंचालकांकडे मंजुरीसाठी पाठवले. मात्र, प्रादेशिक सहसंचालकांनी प्रोसेसिंग नामंजूर केले.
त्यानंतर सोमेश्वर कारखान्याच्या जिरायती भागातील अंजनगाव, जळगाव सुपे, देऊळगाव, कारखेल या भागातील 45 सभासदांनी मुंबई उच्च न्यायालयात माळेगाव कारखान्याने सभासद करून घेण्यासाठी धाव घेतली. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने सभासदांची याचिका फेटाळून लावली आहे.
यासंदर्भात कारखान्याचे माजी चेअरमन रंजन कुमार तावरे यांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि माळेगावच्या संचालक मंडळाचा कुटील डाव न्यायालयाने हाणून पाडला असल्याचे म्हटले आहे. याचिका दाखल करताना कारखान्यातर्फे वकील नियुक्त करण्यात आल्याचा आरोप कारखान्याचे माजी चेअरमन रंजन तावरे यांनी केला आहे.