मुकेश आणि नीता अंबानींना धमकी, धमकीच्या पत्राने मुंबई पोलिसांची उडवली झोप

उद्योगपती मुकेश अंबानींच्या अँटिलिया चेंबर्स या मुंबईतल्या घराजवळ पार्क केलेल्या बेवारस गाडीत एक धमकीचं पत्र सापडलं आहे. 

Updated: Feb 26, 2021, 05:06 PM IST
मुकेश आणि नीता अंबानींना धमकी, धमकीच्या पत्राने मुंबई पोलिसांची उडवली झोप  title=

प्रशांत अंकुशराव, मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानींच्या अँटिलिया चेंबर्स या मुंबईतल्या घराजवळ पार्क केलेल्या बेवारस गाडीत एक धमकीचं पत्र सापडलं आहे. या पत्रानं मुंबई पोलिसांची झोप उडवली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे जिलेटीनच्या किमान 20 कांड्यासह हे धमकीपत्र आढळून आलं आहे. जिलेटीनचा स्फोट करण्यासाठी कोणतीही व्यवस्था तिथं नव्हती. याचाच अर्थ, अंबानींना धमकी देण्यासाठी हा प्रकार केला गेला आहे. मात्र त्यामुळे याचं गांभिर्य कमी होत नाही. ही धमकी कुणी आणि का दिली, हे कोडं पोलिसांना सोडवायचं आहे. 

मोडक्या तोडक्या इंग्लिश आणि हिंदीत लिहिलेली ही चिठ्ठी मुंबई इंडियन्स लिहिलेल्या बॅगेत सापडली आहे. रात्री 1च्या सुमारास राजेश सिंग यांच्या दुकानासमोर ही गाडी पार्क करण्यात आली. सिंग यांच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला आहे.

आता हे फूटेज आणि 9 प्रत्यक्षदर्शींच्या चौकशीतून पोलीस माग काढण्याचा प्रयत्न करतायत. गाडी अँटालियापाशी येण्याआधी हाजीआलीच्या सिग्नलपाशी रात्री १२.२० वाजता दिसली होती. तिथं तब्बल १० मिनिटं उभी होती. विशेष म्हणजे, या स्कॉर्पियोची नंबरप्लेट अर्थात बनावट आहे. MH01DK9945 हा अंबानींच्या सुरक्षाताफ्यातील एका गाडीचा नंबर वापरण्यात आलाय हे विशेष.

शिवाय गाडीमध्ये आणखी काही बनावट नंबर प्लेटही आढळून आल्यात. ही गाडी 8-10 दिवसांपूर्वी विक्रोळीमधून चोरीला गेल्याचंही निष्पन्न झालं आहे.

या प्रकारानंतर आता अंबानींच्या घराजवळील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 8 दिवसांपूर्वी विक्रोळीतून चोरीला गेल्यानंतर ही स्कॉर्पियो कुठे-कुठे गेली होती. याचा माग काढण्याचा प्रयत्न आता पोलीस करत आहेत. अंबानींना नेमकी धमकी कुणी आणि का दिली, यामागे कोणती अतिरेकी संघटना आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x