लसीकरण वाढवण्यासाठी मुंबई मनपाने कंबर कसली, घेतला 'हा' मोठा निर्णय

ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता मुंबई पालिका सतर्क झाली आहे

Updated: Dec 14, 2021, 09:56 PM IST
लसीकरण वाढवण्यासाठी मुंबई मनपाने कंबर कसली, घेतला 'हा' मोठा निर्णय title=

मुंबई :  मुंबई महानगरातील (Mumbai Municipal Corporation) सर्व पात्र नागरिकांचे कोविड लसीकरण (Corona Vaccination) पूर्ण करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कंबर कसली असून आता रात्रपाळीतही विशेष लसीकरण सत्र राबविण्यात येत आहे. यासाठी सर्व विभागांमध्ये रात्रपाळी मोबाईल चमू अथवा एक लसीकरण केंद्र सुरु करण्यात आलं आहे. 

बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात 16 जानेवारी 2021 पासून कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण सुरु करण्यात आलं. सुरुवातीला प्राधान्य गट आणि त्यानंतर 1 मे 2021 पासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचं लसीकरण करण्यात येत आहे. मुंबई महानगर क्षेत्रात आतापर्यंत 80 टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. याचाच अर्थ अजून 20 टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतलेली नाही. 

कोविड विषाणूचा ओमायक्रॉन (Omicron) या नवीन व्हेरिएंटचा धोका लक्षात घेता, 100 टक्के नागरिकांचे पूर्ण लसीकरण लवकरात लवकर करणं अपेक्षित आहे. 

या दोन्ही बाबी लक्षात घेता, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या निर्देशानुसार, तसंच मुंबईकर नागरिकांच्या सोयीसाठी महानगरपालिका प्रशासनाने कोविड लसीकरण आणखी गतिमान करण्याचा निर्णय घेतला आहे. 

यासाठी सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत सर्व विभागात एक रात्रपाळी मोबाईल चमू किंवा एक लसीकरण केंद्र सुरु करण्यात आलं आहे. रात्रपाळीतील मोबाईल चमू उपनगरीय रेल्वे स्थानक, झोपडपट्टी व तत्सम वसाहती, बांधकामाच्या ठिकाणी कार्यरत असतील. रोजंदारी मजूर, उशिरापर्यंत नोकरी करणारे कर्मचारी, रस्त्यावर राहणारे नागरिक, फेरीवाले इत्यादी गटातील नागरिकांचे या मोबाईल चमू आणि विशेष लसीकरण केंद्रांद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे. 

त्यासोबत, ज्या विभागातील एखाद्या ठिकाणी नागरिकांचे मोठ्या प्रमाणात लसीकरण होणे शिल्लक असेल तर त्या ठिकाणी विशेष लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे. 

ज्या नागरिकांचे कोविड लसीकरण पूर्ण होणे बाकी असेल, त्या नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि कोविड लसीकरण पूर्ण करुन घ्यावे. असं आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.