मुंबईकरांनो लक्ष द्या! मतमोजणीच्या दिवशी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर 'या' वाहनांना बंदी

 Traffic Restriction : लोकसभा निकालाच्या मतमोजणीच्या दिवशी मुंबईत काही ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. जाणून घ्या सविस्तर   

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 3, 2024, 05:57 PM IST
मुंबईकरांनो लक्ष द्या! मतमोजणीच्या दिवशी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर 'या' वाहनांना बंदी title=
Traffic Restriction For Heavy Vehicles At WEH On Vote Counting Day Check Details Here

 Traffic Restriction: 4 जून रोजी लोकसभा निवडणुकांची मतमोजणी होत आहे. सर्व देशाचे लक्ष याकडे लागून राहिले आहे. देशभरातील सर्व मतदारसंघात मतमोजणीची तयारी करण्यात पूर्ण झाली आहे. मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह मत मोजणीची रंगीत तालीमदेखील घेण्यात आली आहे.  पश्चिम द्रुतगती महामार्गावर 4 जून रोजी काही काळ अवजड वाहनांवर निर्बंध असणार आहेत. 

पश्चिम द्रुतगती महामार्गावरील गोरेगाव पूर्व येथे पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि नेस्को प्रदर्शन केंद्रात उभारण्यात आलेले मतमोजणी केंद्र असल्याने पोलिसांनी 4 जून रोजी जोगेश्वरी ते दहिसर चेक नाक्याजवळील शंकरवाडी या मार्गावर सर्व खासगी बस आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे. पहाटे 5 ते संध्याकाळी 7 पर्यंत या भागात अवजड वाहनांना बंदी असणार आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे (WEH) चा मुख्य भाग नियमित रहदारीसाठी सामान्य असेल. 

जोगेश्वरी वाहतूक विभागाच्या हद्दीत एकूण तीन मतदार संघाची मतमोजणी नेस्को प्रदर्शन सेंटर, पश्चिम द्रुतगती महामार्ग, उत्तर वाहिनी गोरेगाव पूर्व या ठिकाणी होणार आहे. त्यामुळं नेस्को समोरील सर्व्हिस रोडवर मतदार संघाचे उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते, प्रसारमाध्यमांची वाहने, अत्यावश्यक सेवेतील वाहने मोठ्या संख्येने येणार आहेत. त्यामुळं पश्चिम द्रुतगती महामार्ग, उत्तर वाहिनी सर्विस रोड, जयकोच जंक्शन ते नेस्को गॅप जंक्शन पर्यंतच्या मार्गावर वाहतूक सेवा सुरळीत ठेवण्याकरिता हा निर्णय वाहतुक विभागाने घेतला आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर दोन्ही वाहिनींवर सर्व प्रकारच्या वाहनांना पहाटे 5 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत निर्बंध असणार आहेत. 

मंगळवार 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. यावेळी मतमोजणीसाठी कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी मुंबई वाहतुक विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई वाहतुक विभागाकडून एक पत्रक जारी करण्यात आले आहे. या पत्रकानुसारच, पहाटे पाच ते संध्याकाळी 6 पर्यंत अवजड वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. सर्व मतपेट्या मतमोजणी केंद्रात विनाअडथळा पोहोचण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, भाजीपाला, दूध, बेकरी उत्पादने, पिण्याचे पाणी, पेट्रोलियम उप्तादने, रुग्णवाहिका, सरकारी आणि निमशासकीय वाहने आणि स्कूल बसेस यासारख्या अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. 

पर्यायी मार्ग कोणते?

जयकोच जंक्शन पश्चिम द्रुतगती महामार्ग, उत्तर वाहिनी सर्विस रोडने नेस्को गॅपकडे जाणारे वाहनांना जयकोच जंक्शन स्लिप रोडने नेस्को गॅप डावे वळण घेऊन इच्छित स्थळी पोहोचू शकता. तसंच, मृणालताई गोरे जंक्शनकडून जयकोच जंक्शनकडे येणारे वाहतुकरीता मृणालताई गोरे जंक्शन उजवे वळण घेऊन मृणालताई गोरे ब्रिजच्यावर युटर्न घेऊन दक्षिण वाहिनीने महानंदा जंक्शन ते स्लिप रोडने जयकोच जंक्शनने पुढे इच्छित स्थळी जातील.