मुंबई : झी २४ तासनं पर्दाफाश केलेल्या कांदिवली हिरानंदानी हेरिटेज सोसायटीमध्ये बोगस लसीकरण प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आलीय. या घोटाळ्याची व्याप्ती वाढली असून मुंबईत ९ ठिकाणी हा घोटाळा झाल्याचं समोर आलंय. घोटाळ्यातील एका आरोपीला मध्यप्रदेशात अटक करण्यात आली असून त्याला मुंबईत आणलं जाणार आहेत. तर दोन जण अजून फरार आहेत.
मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरु आहे. पण याचा गैरफायदा काही बोगस संस्थांकडून घेतला जात आहे. तीन दिवसांपूर्वी कांदिवली इथल्या हिरानंदानी हेरिटेज सोसायटीमध्ये बोगस लसीकरण झाल्याचं समोर आलं होतं. याप्रकरणी गुन्हा दाखल करत चार व्यक्तींना अटक करण्यात आली. एका आरोपीला मध्यप्रदेशमधून अटक केली आहे. तर यातील दोन व्यक्ती फरार आहेत. धक्कादायक म्हणजे या आरोपींनी लसीकरणासाठी वापरेल्या लस कोणत्याही अधिकृत व्यक्तीकडून विकत घेतल्या नव्हत्या. नागरिकांना प्रमाणपत्र देण्यासाठी आरोपींपैकी एक व्यक्ती विविध नामांकित हॉस्पीटलमधील आयडी चोरी करत असल्याचं चौकशीत समोर आलं आहे. महेंद्रसिंग असं घोटाळ्यातील मुख्य आरोपीचं नाव आहे.
प्रकरण नेमकं काय आहे
कांदिवलीतील हिरानंदानी हेरिटेज सोसायटीमध्ये 30 मे रोजी लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली होती. या लसीकरण मोहिमेमध्ये 390 नागरिकांनी सहभाग घेतला होता. पण, लसीकरणानंतर प्रमाणपत्र देण्यात आलं नाही. लस घेतल्यानंतर रहिवाशांना ताप, अंग दुखी यासारखे परिणामही दिसून आलेले नाहीत. काही दिवसांनंतर लाभार्थ्यांना वेगवेगळ्या रुग्णालयांच्या नावाने लसीकरण प्रमाणपत्र देण्यात आलं होतं. ही सर्व बाब संशय निर्माण करणारी असल्याने सोसायटीतील रहिवाशांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. लस घेतल्यानंतर लसीकरणाचा फोटो किंवा सेल्फी घेण्यास मनाई करण्यात आली होती, असं सोसायटीतील रहिवाशांनी सांगितले.