VIDEO : नारायण राणेंच्या आरोपांना माजी मुख्यमंत्र्यांचं प्रत्यूत्तर

'जाब विचारण्यासाठी समोरचा माणूस सुशिक्षित असावा लागतो, निदान गुंड तरी नसाव अशी अपेक्षा असते' अशा शेलक्या शब्दांत जोशींनी नारायण राणेंना टोला हाणलाय

Updated: May 8, 2019, 03:42 PM IST
VIDEO : नारायण राणेंच्या आरोपांना माजी मुख्यमंत्र्यांचं प्रत्यूत्तर title=

मुंबई : नारायण राणे यांच्या आत्मचरित्रावर शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी आपली तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राणेंनी आत्मचरित्रात केलेले आपल्यावरचे सगळे आरोप मनोहर जोशी यांनी फेटाळून लावले आहेत. मनोहर जोशींचा २००४ च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांना सुभाष देसाईंकडील शिवसेना सरचिटणीसपद हवं होतं. त्यासाठी देसाईंना विरोधी पक्षनेतेपदी बसवण्याच्या हालचाली जोशींनी सुरु केल्या होत्या, असं राणेंनी आपल्या आत्मचरित्रात म्हटलंय. यावर प्रतिक्रिया देताना, अशा गोष्टी मी करत नाही, असं वक्तव्य जोशींनी केलंय. 

प्रत्येकानं आपापलं राजकारण कसं करायचं हे ठरवलेलं असतं, काही जण मारामारी करून करतात, असा टोलाही जोशींनी राणेंना हाणलाय. 'बाळासाहेब ठाकरे जे मला माहीत आहेत, ते मुलांना विचारून धोरणं ठरवतील असं मला वाटत नाही. स्वतंत्र बुद्धीचा, मेहनती आणि अहोरात्र संघटनेला वाहून घेतलेला माणूस आपल्या हाताखालच्या एका माणसाला कशासाठी घाबरेल?' असंही जोशींनी म्हटलंय. राणेंना पक्षात ठेवलं तर मी रश्मी ठाकरे यांच्यासोबत घरातून निघून जाईल अशी धमकी उद्धव यांनी बाळासाहेबांना दिली होती, असा आरोप नारायण राणे यांनी आपल्या आत्मचरित्रात केलाय. 

नारायण राणेंनी केलेल्या आरोपांचा जाब विचारणार का? असा प्रश्न विचारला असताना 'जाब विचारण्यासाठी समोरचा माणूस सुशिक्षित असावा लागतो, निदान गुंड तरी नसाव अशी अपेक्षा असते' अशा शेलक्या शब्दांत जोशींनी नारायण राणेंना टोला हाणलाय. 

काय म्हटलंय नारायण राणेंनी आत्मचरित्रात

उद्धव ठाकरे आणि मनोहर जोशी यांच्यामुळे आपल्याला शिवसेनेतून बाहेर पडावे लागल्याचं राणेंनी आपल्या आत्मचरित्रात म्हटलंय. 'शिवसेनेच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर बाळासाहेबांनी मला भेटायला बोलावले होते. त्यांना आपल्या निर्णयाचा फेरविचारही करायचा होता. मात्र, तेव्हा उद्धव यांनी बाळासाहेबांना स्पष्ट सांगितले की, राणेंना पक्षात ठेवल्यास मी आणि रश्मी घर सोडून निघून जाऊ... त्यामुळे बाळासाहेबांचा नाईलाज झाला', असं त्यांनी आत्मचरित्रात उल्लेख केलाय. काही प्रामाणिक शिवसैनिकांनी ही माहिती आपल्याला दिल्याचंही राणेंनी सांगितलंय.  

याशिवाय, नारायण राणे यांनी आत्मचरित्रात मनोहर जोशी यांच्यावरही तोंडसुख घेतले आहे. मनोहर जोशी यांच्यामुळेच शिवसेनेची वाट लागली. माझ्यासाठी मुख्यमंत्रिपद सोडावे लागल्याने जोशींच्या मनात एक प्रकारचा राग होता. वरकरणी जोशी पक्षाचे भले चिंतत असल्याचे दाखवत असले तरी प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही. त्यामुळेच आज शिवसेनेची अशी अवस्था झाली आहे. मला डावलण्यासाठी जोशी यांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी सुभाष देसाई यांचे नाव पुढे रेटले, असेही राणेंनी सांगितले.