Viral Video: मुंबईच्या रस्त्याने लावली 1 कोटींच्या कारची वाट; पाहा नेमकं काय झालं?

Viral Video: मुंबईत एका स्पीड ब्रेकरमुळे (Speed Braker) Jaguar XJ कार अडकून पडल्याचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इतक्या महागड्या कारला अखेर धक्का देऊन बाहेर काढण्याची वेळ आली. मुंबई महापालिकेनेही या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली असून दखल घेत असल्याचं म्हटलं आहे.   

Updated: Mar 1, 2023, 04:47 PM IST
Viral Video: मुंबईच्या रस्त्याने लावली 1 कोटींच्या कारची वाट; पाहा नेमकं काय झालं?  title=

Viral Video: मध्यमवर्गीय असो किंवा श्रीमंत व्यक्ती असो...गाडी विकत घेताना त्यात सर्व सुखसोयी असाव्यात अशी प्रत्येकाची इच्छा असतो. पैसा असेल तर जास्तीत जास्त महागडी कार विकत घेणं प्रत्येकाचंच स्वप्न असतं. कार विकत घेताना त्यात असणारे फिचर्स यासह सुरक्षा या गोष्टींना आपण प्राधान्य देतो. पण जर एखादी महागडी गाडी विकत घेतली असेल पण रस्ताच चांगला नसेल किंवा पायाभूत सुविधा योग्य नसतील तर काय फायदा? नेमका हाच प्रश्न तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पडेल. 

रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांचा वेग नियंत्रित करण्याच्या हेतूने महत्त्वाच्या ठिकाणी स्पीड ब्रेकर्स (Speed Brakers) उभारलेले असतात. पण हे स्पीड ब्रेकर्स कधीकधी चालकांसाठी अडचणीचे ठरतात. नुकतंच मुंबईत (Mumbai) असा एक अनुभव देणारा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. याचं कारण म्हणजे एक कार मुंबईतल्या स्पीड ब्रेकरवर अडकली होती. बरं ही कार काही साधीसुधी नव्हती तर तब्बल 1 कोटी किंमत असणारी Jaguar XJ होती. कार अडकल्याने चालक इतका हतबल झाला होता की, लोकांना अक्षरश: गाडीला धक्का देऊन बाहेर काढावं लागलं. 

एका इन्स्टाग्राम युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने Jaguar XJ रस्त्यात अडकल्याचं सांगत व्हिडीओच दाखवला आहे. "आर्थिक राजधानीत योग्य रस्तेही का नाहीत?" अशी विचारणा त्याने केली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sid Sharma (@simplysid08)

व्हिडीओत दिसत आहेत त्याप्रमाणे स्पीड ब्रेकरची उंची जास्त असल्याने Jaguar पूर्णपणे त्याच्यात अडकली आहे. दरम्यान वर्दळीचा रस्ता असल्याने यावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे रिक्षाचालक आणि इतरांनी कारला धक्का देत बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण चालक आणि लोकांनी प्रयत्न करत असूनही कार काही निघत नव्हती. अखेर सुदैवाने शेवटी ही कार बाहेर पडते आणि सगळेच सुटकेचा निश्वास टाकतात. 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओने मुंबई महापालिकेचंही लक्ष वेधलं आहे. "आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल अभिनंदन. आम्ही आमच्या टीमला तात्काळ याची दखल घेण्यास सांगितलं आहे," असं मुंबई पालिकेने ट्वीटरला म्हटलं आहे.

या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केली आहे. तसंच हा व्हिडीओ 30 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. काहींना अशा गाड्या भारतात विकतच घेऊ नये असं म्हटलं आहे, तर एकाने हा स्पीड ब्रेकर आहे की कार ब्रेकर असं उपहासात्मकपणे विचारलं आहे.