राधाकृष्ण विखे-पाटील यांचा भाजप प्रवेश 'जैसे थे'

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा मुद्दा अजून जैसे थे आहे.  

Updated: Jun 1, 2019, 11:33 PM IST
राधाकृष्ण विखे-पाटील यांचा भाजप प्रवेश 'जैसे थे'  title=

अमित जोशी, मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा मुद्दा अजून जैसे थे आहे. राधाकृष्ण यांनी काँग्रेस आमदारकीचा राजीनामा दिला नसल्याने हा विषय पुढे सरकला नसल्याची माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीपर्यंत राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलला जाण्याची शक्यता नसल्याचे संकेत पाटील यांनी दिले आहेत. 'झी २४ तास'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हे स्पष्ट केले आहे. 

दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांनी ईडीची नोटीस मिळणे आणि आगामी निवडणुका यांचा काहीही संबंध नसल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले आहे. प्रफुल्ल पटेल यांना ६ जूनला चौकशीसाठी हजर राहण्यास या नोटीशीद्वारे सांगण्यात आले आहे. त्यावर त्यांनी हे भाष्य केले.

आगामी विधानसभा निवडणूका लक्षात घेऊन भाजपच्या ४० पेक्षा जास्त आमदारांना नारळ दिला जाणार असल्याच्या प्रश्नावर सावध मत पाटील यांनी व्यक्त केले आहे. अजून विधानसभा निवडणुकीसाठी कोणताही सर्व्हे झाला नसल्याने कोणताही निर्णय झाला नसल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.

दरम्यान, विधानसभा निवडणुकांनंतर मुख्यमंत्री हे दिल्लीत जाणार असल्याचे अप्रत्यक्षपणे मुलाखतीच्या शेवटच्या प्रश्नाला उत्तर देतांना चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.