कोण आहेत मनोज मोदी? ज्यांना मुकेश अंबानी यांनी गिफ्ट दिलंय तब्बल 1500 कोटीचं आलिशान घऱ

Who is Manoj Modi: रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी (Reliance Head Mukesh Ambani) यांनी आपला सहकारी मनोज मोदी (Manoj Modi) यांना गिफ्ट म्हणून तब्बल 1500 कोटींचं घर दिलं आहे. यानंतर सगळीकडे मनोज मोदी नेमके कोण आहेत? अशी चर्चा रंगली आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 26, 2023, 03:32 PM IST
कोण आहेत मनोज मोदी? ज्यांना मुकेश अंबानी यांनी गिफ्ट दिलंय तब्बल 1500 कोटीचं आलिशान घऱ title=

Who is Manoj Modi: आशियामधील सर्वात श्रीमंत आणि देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सध्या त्यांचं नाव चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे, मुकेश अंबानी यांनी आपल्या कर्मचाऱ्याला तब्बल 1500 कोटींचं आलिशान घर गिफ्ट म्हणून दिलं आहे. मुकेश अंबानी यांनी आपल्या कर्मचाऱ्याला इतकं महागडं घर दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. यानंतर सगळीकडेच हा कर्मचारी नेमका कोण आहे? आणि त्याला इतकं महागडं घर का दिलं आहे? याची चर्चा रंगली आहे. मुंबईतील नेपियन्सी रोडवर ही 22 मजली इमारत असून 'वृंदावन' असं नाव ठेवण्यात आलं आहे.

मुकेश अंबानी यांनी तेल, गॅसपासून ते रिटेलपर्यंत अनेक ठिकाणी आपल्या व्यवसायाचा विस्तार केला आहे. पण मुकेश अंबानी यांच्या प्रत्येक निर्णयामागे एक व्यक्ती असते. या व्यक्तीला मुकेश अंबानी यांचं राईट हँड म्हणून ओळखलं जातं. अंबानींच्या यशात तसंच त्यांच्या प्रत्येक निर्णयात मोलाचं योगदान असणाऱ्या या व्यक्तीला MM नावाने पुकारलं जातं. यांचं पूर्ण नाव मनोज मोदी (Manoj Modi) आहे. मुकेश अंबानी यांनी मनोज मोदी यांनाच मुंबईत हे आलिशान घर गिफ्ट केलं आहे. 

मुकेश अंबानींचे वर्गमित्र आहेत मनोज मोदी

मनोज मोदी हे मुकेश अंबानी यांचे अत्यंत जवळचे सहकारी आहेत. दोघेही कॉलेजपासूनचे मित्र आहेत. अंबानी आणि मोदी मुंबईमधील युनिव्हर्सिटी ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये वर्गमित्र होते. दोघांनीही केमिकल इंजिनिअरिंगमध्ये (Chemical Engineering) बॅचलर डिग्री घेतली आहे. रिलायन्स ग्रुपमध्ये दोघांनीही एकत्रच प्रवेश केला होता. मनोज मोदी 1980 मध्ये रिलायन्स ग्रुपशी जोडले गेले होते. तर मुकेश अंबानी यांनी 1981 मध्ये आपल्या वडिलांसह व्यवसाय सांभाळण्यास सुरुवात केली होती. गुजरात कुटुंबात जन्माला आलेले ममोज मोदी यांच्या कुटुंबात पत्नी आणि दोन मुली आहेत. मात्र त्यांच्याबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही. 

मनोज मोदी यांना रिलायन्समध्ये MM नावाने ओळखलं जातं. धीरुभाई अंबानी यांच्या नेतृत्वात त्यांनी रिलायन्समध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी मुकेश अंबानी आणि त्यांची मुलं ईशा, आकाश आणि अनंत यांच्यासोबतही काम केलं आहे. म्हणजेच अंबानी कुटुंबाच्या तीन पिढ्यांसोबत त्यांनी काम केलं आहे. 

पण अंबानी कुटुंबाशी जोडलेले असतानाही मनोज मोदी यांचं नाव जास्त चर्चेत येत नाही. याचं कारण ते स्वत: लाइमलाइटपासून दूर राहतात. तसंच ते कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ते अॅक्टिव्ह नसतात. 

मनोज मोदी यांना मुकेश अंबानी यांचं राईट हँड म्हणून ओळखलं जातं. ते नेहमीच मुकेश अंबानी यांच्यासोबत असतात. ते सध्या रिलायन्स रिटेल आणि रिलायन्स जिओच्या डायरेक्टर पदावर आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, 1980 मध्ये रिलायन्सशी जोडले गेल्यानंतर ते कोणत्याही पदाविना अंबानींसोबत काम करत आहेत. 2007 मध्ये त्यांची डायरेक्टरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अंबानी कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी मनोज मोदी यांच्याशी चर्चा करतात. 

अनेक मोठ्या डिल्सच्या मागे मनोज मोदी

एप्रिल 2020 मध्ये रिलायन्स जिओने फेसबुकशी केलेल्या मोठ्या डीलच्या मागे मनोज मोदी यांचं डोकं होतं. या 43 हजार कोटींच्या डीलने रिलायन्सला कर्जमुक्त होण्यात मदत केली होती. याशिवाय अनेक मोठ्या प्रोजेक्ट्समागे मनोज मोदी आहेत, ज्यामध्ये हजीरा पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स, जामनगर रिफायनरी, रिलायन्स रिटेल आणि 4 जी यांचा समावेश आहे.