मुंबई : हिवाळी अधिवेशात आज विधिमंडळात सत्ताधारी विरुद्ध विरोधक शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले. 15 लाख रुपये देण्याच्या मुद्द्यावरुन जोरदार आक्षेप नोंदविण्यात आला. सत्ताधारी पक्षातून ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी मोदी हे लोकांच्या 15 लाख खात्यात जमा करणार होते, असे म्हणताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झालेत. आधी सभागृहात माफी मागा अन्यथा कामकाज होऊ देणार नाही, असा गंभीर इशारा सरकारला दिला. त्यानंतर ऊर्जा मंत्र्यांच्या मदतीला शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव धाऊन आले. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांची नक्कल केली. यानंतर विरोधक अधिक आक्रमक झालेत.
वीज मोफत देण्यावरुन विधिमंडळात विरोधक आणि सरकार यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणालेत, तुम्ही घोषणा केली 100 युनिटपर्यंत वीज मोफत देणार. पण ती दिली नाही. यावर उत्तर देताना नितीन राऊत म्हणाले, 15 लाख देणार म्हणून पंतप्रधान मोदी बोलले, दिले का?
त्यानंतर फडणवीस अधिक आक्रमक होत सिद्ध करा कधी बोलले, पुरावे द्या. नाहीतर माफी मग. देशाच्या पंतप्रधानांच्याबाबतीत चुकीचे वक्तव्य केले तर योग्य नाही. माफी मागितली पाहिजे, अशी मागणी केली. यावेळी नितीन राऊत यांनी म्हटले, 2014 निवडणुकीत देशाबाहेर काळा पैसे परत आणीन आणि 15 लाख देऊ अस म्हंटल होत तपासून घ्या, असे प्रतिउत्तर दिल्यानंतर फडणवीस अधिक आक्रमक झालेत. देशाच्या पंतप्रधानांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, असे सांगत माफी मागण्याची मागणी केली.
यावेळी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी विरोधी पक्षनेते शब्दच्छल करत असल्याचा आरोप केला. 2014मध्ये ते पंतप्रधान होण्यापूर्वी 100 वेळा बोलले आहेत. यानंतर पुन्हा फडणवीस आक्रमक झालेत. भास्कर जाधव यांना निलंबित करा, पंतप्रधानांची नक्कल करता का, असा सवाल केला.
यांच्या नेत्यांची आम्ही नक्कल केली तर चालेल का. अंगविक्षेप करून पंतप्रधानांची नक्कल करत आहात. माफी मागितली पाहिजे. त्यावेळी भास्कर जाधव म्हणाले, ते पंतप्रधान होण्यापूर्वी म्हणाले 15 लाख देतो असे म्हणाले. यावरुन फडणवीस अधिकच आक्रमक झाले. त्यानंतर भास्कर जाधव यांनी मी माझे शब्द आणि अंगविक्षेप मागे घेतो. त्यानंतर फडणवीस म्हणाले, अंगविक्षेप मागे घेता येत नाही. त्यांना वाटत त्यांना सगळं कळत. पण तसं नाही. त्यांनी मान्य केलं अंगविक्षेप केलं
माफी मागितली पाहिजे, त्यानंतर भास्कर जाधव यांनी बिनर्शत सभागृहात माफी मागितली आणि वादावर पडदा टाकला.
भास्कर जाधव यांनी केली आधी नक्कल, नंतर मागितली जाहीर माफी