'दृश्यम' स्टाईलने घडला गुन्हा, पण एक चूक झाली अन्...

जाणून घ्या कुठे घडली ही घटना... 

Updated: Aug 14, 2019, 09:28 AM IST
'दृश्यम' स्टाईलने घडला गुन्हा, पण एक चूक झाली अन्... title=

मुंबई : बॉलिवूड चित्रपट हे विविध विषयांवर कायमच भाष्य करत असतात. कित्येकदा तर, या चित्रपटांची प्रेक्षकांवर अशी काही छाप पडते की विचारून सोय नाही. अशाच काही कलाकृतींपैकी एक म्हणजे काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला चित्रपट 'दृश्यम'. २०१५ मध्ये अभिनेता अजय देवगण, श्रिया शरण यांच्या मुख्य भूमिका असणारा दृश्यम हा अफलातून कथानक असणारा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. 

एका हत्येचा थररा, रहस्य आणि त्याभोवती फिरणारं कथानक अतिशय सुरेखपणे या चित्रपटाच बांधण्यात आलं होतं. आजही या चित्रपटाची लोकप्रियता कायम आहे. अशा या चित्रपटाच्याच धर्तीवर मुंबईत एक गुन्हा घडल्याचं धक्कादायक वृत्त समोर येत आहे. पण, 'दृश्यम'प्रमाणे या गुन्ह्याचा अंत झालेला नाही. 

मुंबईत एका विवाहितेने तिच्या माहेरच्या मंडळींच्या साथीने प्रियकराची हत्या घडवून आणली. पूर्ण बेत आखूनच गोष्टी पुढे गेल्या होत्या. 'दृश्यम' चित्रपटाप्रमाणे प्रत्येक कुटुंबीयाकडून नोंदवण्यात आलेला जबाब हा तंतोतंत एकमेकांशी जुळत होता. पण, एक चूक झाली आणि पोलिसांना या हत्येचं गुढ उकलण्यास सहज मदत झाली. 

ज्याप्रमाणे 'दृश्यम'मध्ये सर्वांची साक्ष ही एकसारखी आणि एकमेकांच्या साक्षीशीच संबंधित असते, त्यामध्ये तसूभरही बदल होत नाही असंच चित्र मुंबईतील वडाळा येथील घटनेच्या तपासादरम्यान पाहायला मिळालं. 

'झी न्यूज' (हिंदी)च्या वृत्तानुसार, बांधकाम सुरु असणाऱ्या परिसरात विजेंद्र कुमार नटके नावाच्या एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. मृतदेहापाशीच त्याची चप्पलही होती. प्रथमदर्शनही हा अपघाती मृत्यू असल्याचं तपास अधिकाऱ्यांना वाटलं. मृत व्यक्तीने दारुच्या नशेत जीव गमावल्याचा निर्ष्कर्ष प्रथमदर्शनी आला. पण, तपास पुढे गेला आणि खरं चित्र उघड झालं. 

काजल पाटील नावाच्या एका महिलेशी विजेंद्रचे प्रेमसंबंध होते. हे प्रेमप्रकरण काजलच्या लग्नापूर्वीपासूनच होतं जे तिच्या लग्नानंतरही सुरु होतं. प्रेमप्रकरणाविषयी माहिती मिळताच पोलिसांची नजर या मुद्द्याकडेही वळली. काजला विवाह कराडमधील एका व्यावसायिकाशी झाला होता. तरीही विजेंद्र तिची भेट घेण्यासाठी वारंवार कराडला जात असे. घटनेच्या एक दिवस आधीसुद्धा तो काजलच्या माहेरी तिला भेटण्यासाठी गेला होता. तेथे त्याचा चांगला पाहुणचारही झाला. खाण्या-'पिण्याची' सोयही करण्यात आली. 

तपासात समोर आलेली एक महत्त्वाची बाब म्हणजे काजलला विजेंद्रपासून मोकळीक हवी होती. ती त्याला दूर करण्याच्या प्रयत्नात होती. यात आमखी एक मुद्दा म्हणजे ज्या प्रकारे मृतदेहापाशी चप्पल आढळली ते पाहता एखादी व्यक्ती दारुच्या नशेत पडली, तर चप्पल ही अस्ताव्यस्त पडेल. पण, ती अशी एकाच ठिकाणी कशी काय आढळू शकते? हा मुद्दा आणखी शंकांना वाव देऊन गेला. पुढे जितक्यांचे जबाब नोंदवले गेले ते सर्वदजण एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत होते. तपास, इतक्या सुरळीतपणे सुरु होता की हीच बाब पोलिसांना खटकली. संशय असल्यामुळे पोलिसांना काजलला ताब्यात घेतलं, तिची विचारपूरस केली आणि अखेर तिनेच सर्व गोष्टी उघड केल्या. 

नेमकं काय घडलं? 

१५ जुलै रोजी काजलने तिचा प्रियकर असणाऱ्या विजेंद्रला वडाळा येथेच जेवणासाठी बोलवलं. जेवणात उंदीर मारण्याचं औषध मिसळण्यात आलं होतं. विजेंद्रला जेवणात काहीतरी मिसळल्याचं लक्षात येऊ नये यासाठी त्याला दारुही देण्यात आली. त्यानंतर काही वेळातच विजेंद्रचा मृत्यू झाला. 

विजेंद्रचा मृत्यू झाल्यानंतर काजलने तिच्या कुटुंबीयांस त्याचा मृतदेह बांधकाम सुरु असणाऱ्य़ा एका परिसरात फेकला. त्यापाशी त्याची चप्पल ठेवली. दुसऱ्या दिवशी ज्यावेळी मृतदेह मिळाला तेव्हा फॉरेंसिक तपासणामध्ये विजेंद्रचा मृत्यू हा अती मद्यप्राशनाने झाल्याची बाब समोर आली. पण, सत्य फार काळ लपून राहिलं नाही. अखेर पोलिसांनी काजलला ताब्यात घेतलं. विजेंद्र आपल्याला धमकावत असल्यामुळे आणि वैवाहिक आयुष्यात अडचणी निर्माण करत असल्यामुळेच हे पाऊल उचलल्याचं तिने सांगितलं होतं.