मुंबई : मेट्रो कारशेड कांजुरमध्ये करण्याचा महाविकासआघाडी सरकारचा निर्णय़ वादात सापडला आहे. कोर्टाने यावर स्थगिती आणली आहे. त्यामुळे पर्यायी जागा तपासण्याचे काम सुरु असल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, 'राज्याच्या विकासकामात केंद्र शासनाने पाठिंबा देणे आवश्यक असून केंद्र शासन आणि राज्य शासन एकत्र येऊन मेट्रो कारशेडबाबतचा वाद सोडवला तर या जागेवर जनतेच्या उपयोगाचा असलेला प्रकल्प पूर्ण करणे सोपे होईल. कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडला विरोध होत असल्याने कारशेडसाठी पर्यायी जागा तपासण्याचे काम सुरु असल्याचंही' त्यांनी म्हटलं आहे.
मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी मेट्रो कारशेडबाबत राज्य शासनाची भूमिका मांडली. 'लोकांच्या हिताला प्राधान्य देताना विकास प्रकल्प पूर्ण होणे आवश्यक असते. मेट्रो कारशेडबाबत केंद्र शासनाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. मात्र या प्रकल्पासाठी केंद्र शासन सध्या अनुकुलता दाखवत नसल्याने राज्य शासनामार्फत मेट्रेा कारशेडसाठी पर्यायी जागा तपासण्याचे काम सुरु आहे.'
'कांजूरमार्गची 40 हेक्टरची जागा ओसाड आहे. भविष्यातील गरज लक्षात घेऊन कारशेड कांजूरमार्गला करण्याचे प्रस्तावित होते. कांजूरमार्गला मेट्रो कारशेड नेल्याने मेट्रो 3,4 आणि 6 या लाईन्सचे एकत्रीकरण शक्य होणार आहे. तीनही लाईनचे कारडेपो एकत्र केले तर या जंक्शनमधून अंबरनाथ-बदलापूरपर्यंत लाईन नेणे शक्य होणार आहे.' हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.