तुम्हीही भाजपच्या पाठीत खंजीर... अजित पवारांनी नानांना खडसावले

देशातील प्रत्येक पक्षाच्या नेत्याला आपला पक्ष वाढावा असे वाटत असते. याचा कुणी वेगळा अर्थ काढू नये. 

Updated: May 12, 2022, 02:18 PM IST
तुम्हीही भाजपच्या पाठीत खंजीर... अजित पवारांनी नानांना खडसावले  title=

मुंबई : देशातील प्रत्येक पक्षाच्या नेत्याला आपला पक्ष वाढावा असे वाटत असते. याचा कुणी वेगळा अर्थ काढू नये. जबाबदार नेत्यांनी वक्तव्य करत असताना त्याचे परिणाम वेगळे होणार नाही खबरदारी घ्यावी, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार ( AJIT PAWAR ) यांनी नाना पटोले ( NANA PATOLE ) याना लगावला आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी ( ADITYNATH YOGI ) यांनी मुंबईत कार्यालय काढण्याची घोषणा केलीय. मुंबईत कुणी कार्यालय काढावे आणि कुणी नाही हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. त्याला विरोध करण्याचे कारण नाही आणि लोकांनी गैरसमजही करून घेऊ नये. महाराष्ट्राचेही दिल्लीत महाराष्ट्र भवन आहे, ठिकठिकाणच्या राज्यात आपल्या राज्यसरकारचे कार्यालय आहे. त्यामुळे त्याला आक्षेप घेण्याचे कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( RAJ THACKAREY ) आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे ( ADITY THACKAREY ) हे अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. आदित्य आणि आमची याबाबत काही चर्चा झाली नाही. पण, कुणाला कुठे जायचे असेल तर तो त्याचा स्वतंत्र अधिकार आहे.

राज ठाकरे यांना म्हणाले.. 

परंतु, जिथे तुम्ही जाणार आहेत तिथे जाताना ते जगजाहीर करून जायचं की गुपचूप जायचं, विमानानं जायचं, रेल्वेने जायचं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. काही जण मोठ्या प्रमाणात प्रोपगंडा करतात. त्यामागे त्यांची काय भूमिका आहे हे त्यांचे त्यांचाच माहित, असा टोला त्यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.
   
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेलं ते विधान अगदीच हास्यास्पद आहे. काँग्रेस आणि एनसीपी पंधरा वर्ष एकत्र होतो. पण, काही ठिकाणी त्यावेळेस काही स्थानिक पातळीवर विरोध होतो. पक्ष वाढवण्याचं काम सर्वानीच केले पाहिजे. जसा आम्हाला अधिकार आहे तसा तो तुम्हालाही आहे.

त्यांना पाहून कुणी मत दिली असती का? 

बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा त्यांनी पक्ष वाढविला. तेच आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे करत आहेत. पक्ष हा त्या पक्षाच्या नेत्याच्या चेहऱ्यावर चालत असतो. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा चेहरा पुढे आला. नरेंद्र मोदी यांचा चेहरा पुढे आला म्हणून भाजप सत्तेत आली. नाही तर आता जे भाजप प्रदेशाध्यक्ष आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत त्यांच्या चेहरा पाहून कुणी मत दिली असती का? असा टोला त्यांनी फडणवीस, चंद्रकांत पाटील याना लगावला.

मग, तुम्ही कुणाच्या पाठीत खंजीर...

आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जे काही विधान करत आहेत ते अगदीच हास्यास्पद आहे. हेडलाईन्स मिळण्यासाठी कदाचित ते तसे बोलले असतील. प्रदेशाध्यक्ष होण्यापूर्वी ते कोणत्या पक्षातून आले होते ते आम्हाला माहित आहे. म्हणून मग आम्ही पटोले यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला असे म्हणायचे का? अशी टीका नाना पटोले यांच्यावर केली.